आम्ही चांगला मित्र गमावला; गडकरींनी व्यक्त केली हळहळ

मुंबई : विनायक मेटे यांचे अपघाती निधन हे दुर्देवी घटना आहे. मला खूप दुःख होत आहे. मेटे माझे अत्यंत जवळचे मित्र होते. अनेक वेळा त्यांची आणि माझी भेट झालेली आहे. महाराष्ट्रामध्ये विकास कामांमध्ये त्यांनी नेहमी भाग घेतलेला आहे. त्यांच्याशी माझे अत्यंत जवळचे संबंध होते. त्यांचा अपघाती निधन हे महाराष्ट्रचे मोठे नुकसान असून आम्ही आपला एक चांगला मित्र गमावला असल्याची भावना गडकरींनी व्यक्त केली आहे.

शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचे अपघाती निधन झाले आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील माडप बोगद्याजवळ हा अपघात झाला. मेटेंच्या निधनानंतर राजकीय वर्तुळातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मेटेंच्या निधनावर दु:ख व्यक्त केले आहे.रस्त्यात अपघात होतात त्यामध्ये अनेक जण मृत्यूमुखी पडतात. भारतीय नागरिकांनी आता संवेदनशील बनायला हवे. या अपघाताचा नेमके कारण मला माहीत नाही. मात्र संपूर्ण भारताला अपघात मुक्त करणे हीच विनायक मेटे यांना वाहलेली खरी श्रद्धांजली असेल, असे म्हणत गडकरींनी शोक व्यक्त केला आहे.

विनायक मेटेंच्या जाण्यानं मराठा समाजाचं नुकसान; नारायण राणेंनी व्यक्त केलं दु:ख

नवी दिल्ली : विनायक मेटे यांचा अपघाती मृत्यू ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. या घटनेबद्दल मी शोक व्यक्त करतो. मी त्यांच्या घरी भेट देणार आहे, अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिली आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळावा, यासाठी त्यांनी आंदोलने केली. त्यांच्या जाण्याने मराठा समाजाचे नुकसान झाले आहे. मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आग्रही आणि आक्रमक असे ते नेते होते. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी विविध मार्ग अवलंबत, आंदोलने करत सतत पाठपुरावा केला, असे नारायण राणे म्हणाले.विनायक मेटेंच्या मराठा समाजाच्या मागण्यांबाबतच्या आक्रमक भूमिकेचे नारायण राणे यांनी कौतुक केले. आता आपण विनायक मेटेंच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांना भेटणार असल्याचे राणे म्हणाले.

मराठा आरक्षणाचा आवाज हरपला, बीडकरांवर शोककळा; सोमवारी पार्थिवावर अंत्यसंस्कार

मेटेंच्या निधनाच्या बातमीवर विश्वासच बसत नाही; शिंदे भावूक

मुंबई : विनायक मेटे यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुर्दैवी आहे. या घटनेवर माझा विश्वास बसला नाही. मराठा समाजासाठी सातत्याने लढणारा एक नेता हरपल्याची भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली आहे. मराठा समाजासाठी न्याय देण्यासाठी त्यांनी अनेक आंदोलने केली. गेल्याच आठवड्यात विनायक मेटे मला भेटले होते, मराठा समाजाला न्याय मिळावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केल्याचे देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

विनायक मेटे यांच्या अपघाताच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. या घटनेच्या तपासासाठी रायगड पोलिसांच्या आठ टीम तयार करण्यात आल्या आहेत. शासन विनायक मेटे यांच्या परिवारासोबत आहे. त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. ते आज मराठा समाजाच्या आरक्षणा संदर्भातील बैठकीला येत असताना त्यांचे अपघाती निधन झाले आहे. मराठा समाजाच्या न्याय मागण्यांसाठी त्यांची मोठी धडपड, तळमळ होती. शासन नक्कीच त्यांच्या भावनेसोबत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

मराठा समाजाला नेतृत्व देणारे व्यक्तिमत्व आज हरपले- फडणवीस

मुंबई : आजचा दिवस खूप दु:खद आहे. राजकारणाची कधीच भरुन न निघणारी हानी झाल्याची भावना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे फडणवीस म्हणाले.

शिवसंग्रामचे नेते, आमचे सहकारी, माजी आमदार विनायकराव मेटे यांच्या अपघाती निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आणि धक्कादायक आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांचे कुटुंबीय, आप्तस्वकीय आणि कार्यकर्त्यांना हे दुःख सहन करण्याची शक्ती परमेश्वर देवो, अशी प्रार्थना करतो, अशा भावना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्या.

मेटेंचा रात्री सव्वा दोनला मेसेज आलेला, मी येतोय. तुमचा विमानात असल्याने फोन लागला नाही. सकाळी बोलतो. तो मेसेज मी सकाळी वाचला. अपरिमित क्षती. अजून त्यांच्या परिवारातील लोक पोहोचायचे आहेत. कार्यकर्त्यांना अंतिम दर्शन घेण्याचे नियोजन आम्ही करतोय. असे फडणवीस म्हणाले.

विनायक मेटे यांचे अकाली निधन मनाला वेदना देणारे-शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शोकभावना
मराठा समाजातील बांधवाना भगिनींना न्याय मिळवून देण्यासाठी सतत झगडणारे शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायकराव मेटे यांचे अकाली अपघाती झालेले निधन मनाला वेदना देणारे आहे ; ईश्वर त्यांच्या कुटुंबीयास या दुःखद प्रसंगी मनाला धीर देण्यास बळ देवो  . अशा शोकभावना शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी व्यक्त केल्या आहेत . विनायकरावांना गेली अनेक वर्ष जवळून पाहण्याचा योग आला , त्यांचा संघर्ष त्यांच्या समाजासाठी तर असायचाच पण त्याच सोबत तळागाळातील प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय देण्याची त्यांची भूमिका असायची , भाजपसोबत असताना त्यांची गोपीनाथरावांसोबत सतत भेट व्हायची , आपला संघर्ष हा मराठा समाजाला एक दिवस न्याय मिळवून देईल याबाबत त्यांना खात्री होती , महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार असताना मुख्यमंत्री म्हणून नेहमी त्यांच्याशी संवाद होत असे , त्यांची तळमळ आणि शोषितांना न्याय देण्याचा आग्रह , धडपड पाहताना नेहमी त्यांचे कौतुक वाटायचे . अधिवेशन काळात विधिमंडळाच्या आवारात होणाऱ्या विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकांमध्ये त्यांचा आग्रह कायम विधानपरिषदेत मराठा आरक्षणाबाबत विशेष चर्चा घेण्याचा असे , त्यांच्या अशा अकाली निधनाने कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे . अशा शब्दात  उद्धव ठाकरे  यांनी त्यांना श्रद्धांजली  अर्पण केली आहे.

सुप्रिया सुळे

“मी विनायक मेटे यांना श्रद्धांजली अर्पण करतेय यावर माझा विश्वास बसत नाही. अपघातात विनायक मेटे गेल्यावर आमच्यासाठी अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक अशी ही बातमी होती. मेटेंशी आमचे राजकीय मतभेद होते पण आमच्या नात्यातील ओलावा कधीही कमी झाला नाही.”

पंकजा मुंडे

“विनायक मेटे यांचं जाणं हा महाराष्ट्रासाठी आणि माझ्यासाठी अत्यंत मोठा धक्का आहे. कसलाही पारिवारिक वारसा नसताना, स्वतःच्या जीवावर, संघटन कौशल्य आणि वाक् चातुर्याच्या जोरावर त्यांनी व्हिजन घेऊन विनायक मेटे यांनी काम केलं.  येत्या आठवड्यात त्यांची आणि माझी भेट ठरलेली. विनायक मेटे यांच्या जाण्यानं मला जो धक्का बसलाय त्यावर बोलण्यास माझ्याकडे शब्द नाहीत.”