विनायक मेटे यांचे अपघाती निधन; मराठा चळवळीचा नेता हरपला

मुंबई,१५ ऑगस्ट  /प्रतिनिधी :- शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचे अपघाती निधन झाले आहे. त्यांच्या गाडीला आज पहाटे मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर माडप बोगद्याजवळ अपघात झाला होता. अपघात झाल्यानंतर त्यांना एमजीएम रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.

आज पहाटे विनायक मेटे आणि त्यांचे सहकारी बीडहून मुंबईकडे जात होते. यावेळी पहाटे पाच वाजता त्यांच्या गाडीला अपघात झाला होता. अपघातानंतर तब्बल एक तास त्यांना मदत मिळाली नसल्याचे त्यांच्या गाडीच्या चालकाने सांगितले आहे. अखेर त्यांनी मुंबईतील एमजीएम रूग्णालयात अखेरचा श्वास घेतला आहे.

मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवर मुंबईच्या दिशेने मेटे येत होते. हायवेवरील पनवेल ते खालपूर दरम्यानच्या माडप बोगद्याजवळ हा अपघात घडला. पुढे जाणाऱ्या गाडीला मेटे यांच्या गाडीने जोरात धडक दिली असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. गाडीच्या डाव्या बाजूचा चक्काचूर झाला आहे. अपघातानंतर मेटे यांना एक तासभर कुणाचीही मदत झाली नाही. त्यानंतर त्यानंतर एमजीएम रुग्णालयात दाखल केले होते. मेटे यांच्या डोक्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाली होती. त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु होते.

दरम्यान, गाडीचे चालक एकनाथ कदम यांनी सांगितले आहे. त्यानंतर मी पोलिसांना १०० नंबरवर कॉल केला पण त्यांची मदत लवकर मिळाली नाही. तब्बल एका तासानंतर आम्हाला मदत मिळाली असा आरोप त्यांच्या चालकाने केला आहे.

विनायक मेटेंच्या पार्थिवावर ​आज  बीड येथे होणार अंत्यसंस्कार

बीड : शिवसंग्राम चे संस्थापक अध्यक्ष विनायकराव मेटे यांचे पहाटे पाच वाजता अपघाती निधन झाल्यानंतर शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांसह बीड जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. आज संध्याकाळपर्यंत विनायकराव मेटे यांचे पार्थिव बीड येथे त्यांच्या घरी नेण्यात येणार आहे. मेटे यांच्या पार्थिवावर १५ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजता शहरातील कॅनॉल रोडवरील एका शेतात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर बीड जिल्ह्याला पुन्हा एकदा हा मोठा धक्का बसल्याने बीड जिल्ह्यातील अजून एक राजकारणातला दर्दी नेता हरवल्याने बीड जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.अंत्यविधी कोठे करायचा, याबाबत कुटुंबियाशी चर्चा करुन अखेर रिलायन्स पेट्रोल पंपामागील कॅनॉल रोडजवळील शेत हे ठिकाण निश्चित करण्यात आले. शिवसंग्राम भवन येथे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अपर अधीक्षक सुनील लांजेवार, उपअधीक्षक संतोष वाळके, पो.नि. केतन राठोड यांनी भेट दिली. त्यानंतर त्यांनी अंत्यविधी स्थळाची पाहणी केली.

अपघाताचा घटनाक्रम

– मराठा आरक्षणाच्या बैठकीला रात्री बीडमधून रवाना
– मेटेंसोबत त्यांचा मुलगा, सुरक्षा रक्षक आणि ड्रायव्हर
– पहाटे 5 वाजता मेटेंच्या गाडीला भातन बोगद्याजवळ अपघात
– मेटेंच्या गाडीला ट्रकची डाव्या बाजूने धडक
– जवळपास अर्धा किमी अंतरापर्यंत मेटेंची गाडी फरफटत गेली
– मेटे मागच्या सीटवर होते
– अपघात होताच विनायक मेटे गाडीमध्येच खाली पडले
– या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर जखम झाली
– अपघातानंतर ड्रायवरनं मेटेंशी संवाद साधला
– अपघातानंतर मेटेंचा ड्रायव्हरशी संवाद
– ड्रायव्हरनं ताबडतोब 108, 100 ला कॉल केला
– 15 ते 20 मिनीटे मेटे अपघातस्थळी पडून
– तातडीनं उपचार न मिळाल्यानं मेटेंचा मृत्यू

कोण होते विनायक मेटे

शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष
मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनातील महाराष्ट्रातील प्रमुख नेते 
मराठा आरक्षणासाठी अनेक आंदोलन 
अरबी समुद्रातील शिवस्मारक समितीचे अध्यक्ष 
मेटे बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील राजेगावातील
शिवसेना भाजप युती सरकारच्या काळातील आमदार 
सलग पाच टर्म विधानपरिषद सदस्य