दुर्मिळ चित्र प्रदर्शनाचा नागरिकांनी लाभ घ्यावा- केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. कराड

औरंगाबाद,१३ ऑगस्ट  /प्रतिनिधी :-  भारतावर अनेक वर्ष इंग्रजांनी राज्य केले. त्यांच्याविरोधात अनेकांनी लढा देऊन देश स्वतंत्र केला. त्यांच्यामुळेच आपल्या देशाचा स्वातंत्र्य अमृत महोत्सव साजरा होतो आहे.  त्याचाच भाग म्हणून देशातील स्वातंत्र्य लढ्याशी संबंधित ऐतिहासिक घटनांची मांडणी चित्र प्रदर्शनातून पहावयास मिळते आहे, ही उल्लेखनीय बाब आहे. या दुर्मिळ अशा  चित्र प्रदर्शनाचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी केले.

Image

            केंद्रीय संचार ब्युरो क्षेत्रीय कार्यालय, जिल्हा माहिती कार्यालय, दक्षिण मध्ये रेल्वे आणि  जिल्हा प्रशासनाने रेल्वे स्थानक परिसरात आयोजित केलेल्या तीन दिवसीय चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन डॉ.कराड यांच्या हस्ते झाले, यावेळी ते बोलत  होते. या प्रसंगी केंद्रीय संचार ब्युरो कार्यालयाचे संतोष देशमुख, रेल्वे स्टेशन व्यवस्थापक एल. के. जाखडे, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, माहिती अधिकारी मीरा ढास, माहिती सहायक श्याम टरके, संजीवनी जाधव यांच्यासह कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, नागरिक यांची उपस्थिती होती.

Image

            औरंगाबादच्या रेल्वे स्थानक परिसरात सर्व नागरिकांसाठी सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मोफत व खुले  चित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आलेले आहे. या प्रदर्शनास नागरिकांनी मोठ्याप्रमाणात सहभागी व्हायलाच हवे. तसेच देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील ऐतिहासिक, दुर्मिळ छायाचित्रे व माहिती या ठिकाणी लावण्यात आली आहे, त्याचा लाभ घ्याययलाच हवा, असे डॉ. कराड म्हणाले.  या प्रदर्शनातून राष्ट्रीय एकात्म‍िकता, देशप्रेमाची भावना वाढण्यास मदत होईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.  शाहीर सुरेश जाधव व संच यांनी  स्वातंत्र्य लढ्यावर आधारित पोवाडा सादर करून उपस्थ‍ितांची मने जिंकली.

            श्री. कराड यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. यावेळी श्री. चिलवंत यांनी विचार मांडले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. देशमुख यांनी केले. आभार श्री. जाखडे यांनी मानले.