लोकनेते विलासराव देशमुख: लोककल्याणाची विचारवाहिनी

माजी मुख्यमंत्री व माजी केद्रींय मंत्री लोकनेते विलासराव देशमुख यांचा १४ ऑगस्ट २०२२ रोजी १० वा स्मृतिदिन आहे. यानिमित्ताने विविध विधायक उपक्रमाने त्यांचा स्मृतिदिन साजरा केला जात आहे. भारतीय राजकारणात नेतृत्वाच्या मांदियाळीत विलासराव देशमुख आपल्या कर्तृत्व, वक्तृत्व आणि नेतृत्वगुणांच्या समुच्चयाने नक्षत्रासारखे चमकून गेले आहेत. हा प्रकाश त्यांच्या कार्याच्यारूपाने अखंड तेवत राहणार आहे.

 लोकशाहीतील लोकनेता हा उगवत्या सुर्यासारखा प्रकाशान अविरत विस्तारत आणि तेवत अनेकांची आयुष्य उजळत असतो. या प्रकाशाने लोकांचे जीवन सुखी, समृध्द आणि संपन्न करतो.विलासराव देशमुख यांचा नेतृत्वाचा प्रवास असाच झाला आहे. बाभळगावचे सरपंच ते राज्याचे दोनदा मुख्यमंत्री, केंद्रियमंत्री अशी त्यांची वाटचाल.

लोकप्रिय नेतृत्व

   आपल कार्य व्यापक करायच असेल तर लोकशाहीमध्ये लोकाच पाठबळ हव असत. ही लोकप्रियता त्यांच वक्तृत्व, लोकसंपर्क, अंगभूत नेतृत्वगूणामूळे विलासरावांना पूरेपूर लाभली होती. गावपातळी पासून देशपातळी पर्यत निष्ठावान कार्यकर्त्यांची साखळी त्यांनी गुंफली होती. तळागाळातील कार्यकर्त्यांना ते थेट नावानीशी ओळखत होते, यामूळे कार्यकर्त्यांची, जनतेची त्यांच्याशी नाळ पक्की जुळली होती. त्यांनी स्थानीक स्वराज्य संस्था पासून संसदे पर्यंत कायम आपल्या पदाधिकाऱ्यांचे संघटन प्रभावी ठेवले आणि विकासासाठी त्यांचे हात कल्पकपणे राबविले. पदाधिकारी, कार्यकर्ते आणि जनता याचा समन्वय राखून विकासाची कामे केली. यामूळे ते लोकांचे लोकप्रिय लोकनेते आणि कार्यकर्त्याचे लोकप्रिय संघटक ही आठवण त्यांची कायम राहणार आहे.

कर्तबगार नेतृत्व

  विलासराव देशमुख राजकारणातील एक कर्तबगार नेतृत्व अशी त्यांची ओळख आहे. त्‍यांनी ज्या ज्या आघाडीवर काम केले, संकटकाळात मदत केली, पक्षासाठी रणशिंग फुंकले त्यावेळी त्यांच्या कर्तृत्व, नेतृत्वगूणाची चमक सर्वांना पाहता आली. कोणत्याही आघाडीची जबाबदारी त्यांना दिली तर त्यात त्यांनी यशच मिळवल. देशात पहिल्यांदा काँग्रेस पक्षाचे सर्वांधिक काळ आघाडी सरकार त्यांनी चालविले. या सरकारच्या माध्यमातून विशेषता बहूजनासाठी कार्य केले. राजकीय, सामाजिक, कृषी, आर्थिक, संस्थात्मक क्षेत्रात त्यांनी केलेले कार्य छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, यशवंतराव चव्हाण यांचा वारसा दाखविणारे आहे. मराठवाडयाचा सिंचन अनुशेष दूर करण्यासाठी पाणी मंजूर करणे, आशिया खंडातील पहिल्या मोनोरेल सेवेस मंजूरी, माहिती अधिकार, मराठवाडा विकासनिधी, महिला बचत गटाना अल्प व्याजाने कर्ज, सामाजिक विकास समन्वय कक्ष, खेळाडूना आरक्षण, दुय्यम न्यायालयात मराठीत निर्णय, ग्रंथालय अनुदानात वाढ, गृहनिर्माण धोरण, राज्यभारनियमनमुक्त केले, झोपडपटटी पुर्नवसन, शेतकरी व विदयार्थ्याना विमा योजना एक ना अनेक ऐतिहासीक निर्णय घेतले यामुळे महाराष्ट्र विकास, गुंतवणूक यामध्ये देशात क्रमांक एकचे राज्य झाले होते. या सारखी विविध आघाडीवर त्यांनी कर्तबगारी केली.

लोककल्याणाची विचारवाहिनी

  महाराष्ट्रात राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, लोकमान्य टिळक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, यशवंतराव चव्हाण यांनी निर्माण केलेली सामाजिक सलोखा व समतेची परंपरा आहे. विविध जाती, पंथ, धर्माची अठरापगड लोक गुण्यागोवीदाने येथे राहतात. अशा प्रकारच सामाजिक वातावरण, सौहार्दतेची संस्कृती विलासरावजींनी जपली आणि वाढवली. यामूळे येथे सर्वांना मुक्तपणे स्वताच्या प्रगतीसाठी, आणि शिक्षण, उद्योग, व्यवसाय, व्यापार सर्व क्षेत्रास चालना मिळाली. सर्वसामान्यांनी वैज्ञानीक विचार, पुरोगामी विचार, प्रबोधनाची कास धरली यातून एक विकासाची चळवळ सुरू झाली. सामाजिक क्षेत्रातील विधायक आंदोलनांनी याकाळात वाईट रुढी, परंपरा, कर्मठता, देवभाळेपण ही दैववादीवृत्ती दूर सारली. एका नव्या प्रगतीच्या विचारांची पेरणी येथे झाली यामूळे राज्याची आणि लातूरची प्रगती सर्व क्षेत्रात झाली. या परंपंरेचे पाईक म्हणून विलासराव देशमुख यांनी कार्य केले.

मांजराकाठावरची जलवाहिनी

  लोकनेते विलासराव देशमुख यांच्या राजकीय कार्याची सुरूवात १९७२ च्या दुष्काळ निवारण कार्यापासून झाली. या काळातच मराठवाडा मधील पाण्याची व सिंचन सुविधांची दाहकता त्यांच्या लक्षात आली होती. यामूळे पूढे त्यांनी मराठवाडयाच्या हक्काचे पाणी मराठवाडयास मिळण्यासाठी कार्यवाही केली. तर लातूर जिल्ह्रयात बंधारे, निम्न प्रकल्प, पाझर तलाव, धनेगाव प्रकल्पाची उंची वाढविली, मांजरा बॅरेजेस उभारणी करून पाणी साठवून सिंचन क्षमता वाढवली. सिचन क्षेत्रातील हे त्यांचे कार्य शेतकऱ्यांना वरदान ठरले आहे. मांजरा नदीवरील बॅरेजेस हा शेतकऱ्यांसाठी क्रांतीकारी निर्णय आहे. आज राज्यात सिंचनाचा मांजरा पॅटर्न म्हणून ओळखला जातो. या सिचंनसुविधेमुळे शेतकऱ्यांच्या जिवनात आर्थिक क्रांती झाली आहे. कारण सिंचन सुविधा झाल्यामूळे लातूर जिल्हयात मोठया प्रमाणात बागायती क्षेत्र वाढले आहे. शेतकरी ऊसपिकासह अनेक नगदी पिक घेण्याची सोय उपलब्ध झाली आहे. त्यांनी उभा केलेल्या या सिंचन प्रकल्पातून उत्पादीत केलेल्या मालाला चांगला दर मिळण्यासाठी उदयोग, व्यवसायास अनुकूल वातावरण माजी मंत्री दिलीपराव देशमुख, माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख, आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी केले आहे. ही विकासाची परंपरा पूढे जात आहे लातूरकरांचे भाग्य आहे.

शेतकऱ्यासाठी आकारली धनवाहिनी

  महाराष्ट्रातील आणि विशेषत: लातूरमधील शेतकऱ्‍यांसाठी कृषीपूरक उदयोग व व्यवसायातून त्यांनी शेतकऱ्यांसाठी कायमस्वरूपी धनवाहिनी आकारली असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. लातूर जिल्हयात कडधान्य, गळीतधान्य व दाळ उत्पादन मोठया प्रमाणात होते हे ओळखून साखर उदयोग, दाळ उदयोग व तेल उदयोगाला चालना दिली. आज येथील हे उदयोग देशपातळीवर नावारूपाला आले आहेत. या उदयोगातून शेतकऱ्यांना कायम स्वरूपी चांगला मोबदला मिळणार आहे. साखर उदयोगाची ही धनवाहीनी आता सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाने आणि माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख व आमदार धिरज देशमुख यांच्या पूढाकारातून अधिक वेगाने पूढे जात आहे.

  ग्रामीण भागातून विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाची जडणघडणच झाली यामुळे शेती, सहकार, ग्रामविकास, ग्रामीण भागातील जनजीवन हे त्यांच्या जिव्हाळयाचे विषय होते, या विषयाला त्यांनी न्याय दिला. शेतकऱ्यासाठी हा एका अर्थाने सुवर्णकाळ होता. त्यांनी शाश्वत आणि आधुनिक शेतीला चालना देण्यासाठी अनेक ऐतिहासिक निर्णय कृषीविकासाठी निर्णय घेतले. यामध्ये कर्जमाफी, शुन्य टक्के व्याजदराने कर्ज, कृषी यांत्रीकीकरणास अनुदान, जैवतंत्रज्ञान धारेण, साखर धोरण, ऊसविकास योजना, इथेनॉल धोरण, अपारंपारीक ऊर्जा धोरण, आजारी साखर कारखान्याना मदत,कृषी प्रक्रीया ऊदयोगाला चालना, कृषी संशोधन संस्थाना भरीव मदत, बाजार समिती अदययावत करणे, कृषी माल तारण योजना, शेती स्वावलंबन मिशन, शेतकरी मार्गदर्शन केंद्र यासरख्या अनेक क्रांतीकारी निर्णय घेतले योजना राबविल्या या योजना कृषीविकासाला दिशा देणाऱ्या आहेत.

कार्याचा अमूल्य ठेवा

  विलासराव यांनी महाराष्ट्र आणि देशासाठी काम केले. लातूर जिल्हा हा तर त्यांचा श्वास होता. लातूर आणि लातूरकरावर त्यांचे अतोनात प्रेम होते. राजकीय जीवनात काम करतांना पहिली पसंती कायम त्यांनी लातूरला दिली. यामूळे लातूरमध्ये अनेक योजना मार्गी लागल्या. जिल्हा पोलीस मुख्यालयाची इमारत, पोलीस  वसाहत, शहरात तीन नवी पोलीस ठाणे उभी केली. सहकारतत्वावर साखर उदयोग उभारला. जिल्हा परिषदची तीन मजली इमारत उभारली,  ४३ प्रशासकीय कार्यालये लातूरमध्ये आणली. नवीन जिल्हा शासकीय रुग्णालय उभारले, गाव तेथे बसगाडी योजना राबविली. लातूर येथे कृषी महाविद्यालय व उदगीर येथे पशूवैद्यकीय महाविद्यालय सुरू केले. कृषी महाविद्यालय, विभागीय कार्यालये लातूरात आणण्यात सिहाचा वाटा विलासरावजींचा होता. लातूरला हे व्यापार व व्यवसायाचे प्रमुख शहर आहे. या शहराला दळणवळणाच्या सोयीसुवीधा उपलब्ध होवून विकासाला गती देण्यासाठी रेल्वे, विमानसेवा व राष्ट्रीय महामार्ग जोडणी यातून लातूर देशातील प्रमुख शहराशी व जगभराशी जोडले. लातूरकरासाठी त्यांनी केलेले कार्य कधीही विसरता येणार नाही.

मांजराच्या पाटावरी तुम्ही ओढली
समृध्दीची खळखळ वाहती जलवाहिनी.
कष्टकऱ्यांच्या घामाचे करण्या मोल
गोड साखरेची उभारली धनवाहिनी.

 विलासराव देशमुख या अलौकीक आणि कर्तबगार नेतृत्वाचा आज स्मृतिदिन आहे, त्यांना मनापासून शतश: नमन, विनम्र अभिवादन!

राहूल हरिभाऊ इंगळे पाटील

रा.करकट्टा ता.जि.लातूर