भाजपा प्रदेशाध्यक्षपदी चंद्रशेखर बावनकुळे यांची नियुक्ती

मुंबई भाजपा अध्यक्षपदी आशिष शेलार

मुंबई ,१२ ऑगस्ट  /प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा जी यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांची भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली. तसेच त्यांनी मुंबई भाजपा अध्यक्षपदी आशिष शेलार यांची नियुक्ती केली.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्याचे मंत्री तथा मावळते प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी चंद्रशेखर बावनकुळे व आशिष शेलार यांचे अभिनंदन केले व त्यांना शुभेच्छा दिल्या.

चंद्रशेखर बावनकुळे विधान परिषद सदस्य आहेत. ते नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. त्यांनी डिसेंबर २०१४ ते २०१९ या कालावधीत राज्याचे ऊर्जा मंत्री म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. त्यांनी २००४, २००९ व २०१४ अशी तीनवेळा कामठी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकली आहे. ते १९९७ व २००२ साली नागपूर जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले होते. सध्या ते पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आहेत. त्यांनी यापूर्वी भाजपा प्रदेश सचिव, नागपूर जिल्हाध्यक्ष, नागपूर जिल्हा सचिव आणि नागपूर जिल्हा भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष म्हणून काम केले होते. त्यांनी १९९० ते १९९५ या कालावधीत अखिल महाराष्ट्र प्रकल्पग्रस्त बेरोजगार समितीचे कार्य केले. कोराडी वीज प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांसाठी त्यांनी लढा दिला होता व आंदोलनात अटक झाली होती.

Image

आशिष शेलार हे या आधीही मुंबईचे प्रदेशाध्यक्ष होते. आगामी मुंबई महापालिकेची निवडणूक लक्षात घेता त्यांच्याकडे पुन्हा ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

२०१७ सालच्या मुंबई महापालिका निवडणुकित आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली भाजपने जोरदार मुसंडी मारून घवघवीत यश संपादन केले होते व शिवसेनेला चांगलेच जेरीस आणले होते. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या तोंडावर शेलार यांच्या हाती पुन्हा एकदा मुंबई भाजपची सूत्र आल्याने पालिकेत सत्तापरिवर्तनासाठी भाजपने कंबर कसल्याचे बोलले जाते.