केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची सावरकर व लोकमान्य स्मारकास भेट

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव

रत्नागिरी,१२ ऑगस्ट  /प्रतिनिधी :- स्वातंत्र लढ‌्याच्या स्मृती आपल्या मनात सदैव रहाव्यात, स्वतंत्र लढ्यातील महान व्यक्तीमत्वांचे स्मरण व्हावे यासाठी हर घर तिरंगा अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत केंद्रीय सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी आज  स्वातंत्र्यवीर सावरकर यांना ठेवण्यात आलेल्या कोठडीला आणि लोकमान्य टिळकांच्या स्मारकाला भेट देऊन अभिवादन केले, त्यांच्या कार्यासमोर, त्यागासमोर मी नतमस्तक झालो असे प्रतिपादन केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी केले.

केंद्रीय मंत्री  नारायण राणे यांनी प्रथम विशेष कारागृहातील स्वा. विनायक दामोदर सावरकर यांनी ज्या छोट्या कोठडीत तुरुंगवास भोगला त्या कोठडीला भेट दिली. तेथील स्वा. सावरकर यांच्या तैलचित्राला अभिवादन केले आणि बंदीवानांशी संवाद साधला व त्यांना मार्गदर्शन केले.  यावेळी कारागृह अधीक्षक चांदणे यांनी  राणे यांचे व अन्य मान्यवरांचे यावेळी स्वागत केले.

त्यानंतर नारायण राणे यांनी शहरातील लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या स्मारकाला भेट दिली. लोकमान्य टिळकांच्या पूर्णाकृती पुतळ्याला त्यांनी अभिवादन केले. टिळकांच्या निवासस्थानाला भेट देऊन तेथे जतन केलेल्या आठवणींची माहिती घेतली.  यावेळी स्वातंत्र्य चळवळीत योगदान दिलेल्यांचा सन्मान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते झाला.

यावेळी त्यांच्यासमवेत रत्नागिरी सिंधुदुर्गचे माजी खासदार निलेश राणे यांच्यासह जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इन्दुराणी जाखड, जिल्हा पोलीस अधीक्षक मोहितकुमार गर्ग, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी प्रशांत पाडळकर, तहसीलदार शशिकांत जाधव, पोलीस निरीक्षक विनीत चौधरी आदि मान्यंवर उपस्थित होते.