ऐन सणांमध्ये कोरोना रुग्णसंख्येत वाढ

मुंबई ,११ ऑगस्ट  /प्रतिनिधी :- सध्या सणांचे दिवस सुरू असून ऐन सणाच्या दिवसांमध्ये मुंबईत कोरोना रुग्णसंख्या वाढताना पाहायला मिळत आहे. गुरुवारी दिवसभरात मुंबईत ६८३ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. वाढत्या रुग्णसंख्येने मुंबईकरांची चिंता वाढली आहे.

गुरुवारी मुंबईत ६८३ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. सध्या मुंबईत सक्रिय रुग्णांची संख्या ३ हजार ८१८ एवढी आहे.दरम्यान दिवसभरात उपचाराने बरे झालेल्यांची संख्या ४०९ एवढी आहे. कोविड आणि इतर आजारामुळे एकाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान गेले काही दिवस कमी झालेली कोरोना रुग्णसंख्या आता सणासुदीच्या कालावधीत वाढताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे पालिकेच्या आरोग्य विभागासह मुंबईकरांचीही चिंता वाढली आहे. बरे झालेल्या रुग्णांचा दर कमी होऊन ९७.९ टक्के झाला आहे; तर कोविड वाढीचा दर ०.०३९ टक्के असून कोविड दुप्पटीचा दर १७९५ दिवस आहे.

सध्या सणांचे दिवस सुरू झाले आहेत. गुरुवारी रक्षाबंधन मोठ्या उत्साहात साजरे झाले. त्यानिमित्त गेल्या काही दिवसांपासून खरेदी आणि प्रवासादरम्यान अनेक ठिकाणी गर्दी झाल्याचे पहायला मिळाले. गोपाळकाला, गणेशोत्सव हे सणही जवळ आले असून त्यामुळे पालिकेच्या आरोग्य विभागाची जबाबदारी वाढली आहे. तसेच नागरिकांनीही सार्वजनिक ठिकाणी वावरताना कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे