“देश का सिपाही हू” चा नारा देत नांदेड जिल्ह्यातील ६ लाख विद्यार्थ्यांनी दिला घरोघरी तिरंगाचा संदेश

May be an image of 6 people and people standing

▪️जिल्हा परिषदेचा अभिनव उपक्रम

▪️जिल्ह्यातील सर्व शाळा सहभागी

▪️अवघ्या 2 दिवसात केले नियोजन

नांदेड ,११ ऑगस्ट  /प्रतिनिधी :- जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा आज नव्या आत्मविश्वासाने गलबलून गेल्या. निमित्त होते भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व घरोघरी तिरंगा उपक्रम. जिल्ह्यातील सुमारे 6 लाख विद्यार्थ्यांच्या देशभक्तीपर सामूहिक गीत गायनाच्या माध्यमातून देशाप्रति कृतज्ञता वृद्धिंगत व्हावी या उद्देशाने या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी अत्यंत कल्पकतेतून सर्व अधिकारी, मुख्याध्यापकांच्या समन्वयातून हा उपक्रम यशस्वी करून दाखविला. जिल्ह्यातील खासगी शाळांसह एकूण 3 हजार 739 शाळा या अभिनव उपक्रमात सहभागी झाल्या. सुमारे 6 लाख 80 हजार विद्यार्थ्यांनी आपली कृतज्ञता या उपक्रमातून दृढ केली तर 24 हजार 400 शिक्षकांनी यात उत्स्फूर्त समन्वय साधत शाळांच्या क्रीडांगणांना देशभक्तीने सजवले.

May be an image of 2 people and people standing

मी याच शाळेत शिक्षण घेऊन लोकप्रतिनिधी झालो. या अभिनव उपक्रमात सहभागी होताना मला विशेष आनंद होत असून प्रत्येक नागरिकांनी  देशाप्रति कृतज्ञता बाळगून घरोघरी तिरंगासाठी पुढे सरसावे, असे आवाहन आमदार मोहन हंबर्डे यांनी केले. या उपक्रमाच्या प्रातिनिधीक शुभारंभाच्या निमित्ताने ते बोलत होते. येत्या 13 ते 15 ऑगस्ट कालावधीत आपण घरोघरी तिरंगा हे अभियान राबवित आहोत. त्यात लोकांनी अधिकाधिक सहभाग घ्यावा, असे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सांगितले.

May be an image of 5 people, people sitting and people standing

शाळेचे विद्यार्थी हे देशाची संपत्ती आहे. निर्मळ भावना घेऊन विद्यार्थी देशाप्रति सदैव तत्पर असतात. घरोघरी तिरंगा हे अभियान संपूर्ण जिल्हाभर यशस्वी करण्यात जिल्ह्यातील विविध शाळांचे सुमारे 6 लाख 80 हजार विद्यार्थी आपल्या घरावर तिरंगा फडकवून भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाला कृतज्ञतेने साक्षीदार होतील असा विश्वास जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी व्यक्त केला. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विलासराव हंबर्डे, सरपंच संध्याताई देशमुख, जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी सविता बिरगे, माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर व मान्यवर उपस्थित होते.

May be an image of 4 people and people standing

या विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासाला बळ देण्यासाठी जिल्हा पोलीस विभागाने आपले बँड पथक खास सादरीकरणासाठी नियुक्त केले होते. या पथकाने विजयकुमार धोंडगे व श्री. वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रगीताची धून व देशभक्तीपर गीत सादर केले. विद्यार्थ्यांनी एक लय व ताल सुरात देशभक्तीपर दहा गाणे सादर केली. यात वंदे मातरम, जयोस्तुते श्री मह्ममंगले, नन्ना मुन्ना राही हू, आओ बच्चो तुम्हे दिखाये, छोडो कल की बाते, हम होंगे कामयाब, सारे जहाँ से अच्छा, विजयी विश्व तिरंगा प्यारा, बलसागर भारत होवो व ये देश है वीर जवानों का.. या देशभक्‍तीपर गीतांचा  समावेश होता.