उदय लळित देशाचे ४९वे सरन्यायाधीश

नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी बुधवारी न्यायमूर्ती उदय उमेश लळित यांची भारताचे ४९ वे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती केली. न्यायमूर्ती लळित २७ ऑगस्ट रोजी सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारतील. विद्यमान सरन्यायाधीश एन. व्ही. रामण्णा एक दिवस अगोदर २६ ऑगस्ट रोजी निवृत्त होणार आहेत.

बार असोसिएशनमधून थेट सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठात पदोन्नती होणारे उदय लळित दुसरे सरन्यायाधीश असतील. त्यांच्या आधी न्यायमूर्ती एस. एम. सिक्री हे मार्च १९६४ मध्ये थेट सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठात पदोन्नती झालेले पहिले वकील होते.न्यायमूर्ती उदय लळित मूळचे महाराष्ट्राचे आहेत. लळित यांचे कुटुंब मूळचे कोकणातील. उदय लळित यांचे आजोबा सोलापुरात वकिली करण्यासाठी आले अन् लळित सोलापूरकर झाले. त्यांचे वडील उमेश लळित हेही मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात न्यायाधीश होते.