स्वातंत्र्य दिन सोहळयाच्या पुर्वतयारी बैठकीत विविध विषयावर चर्चा

‘हर घर तिरंगा’ उपक्रम 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान सर्व नागरिकांनी राबवावा

औरंगाबाद,१० ऑगस्ट  /प्रतिनिधी :- भारतीय स्वातंत्र्यदिनाचा 75 वा वर्धापन दिन सोमवार, दिनांक 15 ऑगस्ट 2022 रोजी साजरा करण्यात येणार आहे. या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘हर घर तिरंगा’ उपक्रम 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान राबविण्यात येणार आहे.  या कालावधीत सर्व नागरिकांनी आपल्या घरावर ध्वजसंहितेचे नियम पाळून तिरंगा लावून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केले आहे.  

भारतीय स्वातंत्र्यदिनाचा 75 वा वर्धापन दिन सोहळ्याच्या पुर्वतयारीची बैठक विभागीय आयुक्त्‍ कार्यालयात जिल्हाधिकारी श्री. चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आज घेण्यात आली. यावेळी बैठकीत विविध विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

स्वातंत्र्य दिनानिमित्त 15 ऑगस्ट रोजी विभागीय आयुक्त कार्यालय येथे होणाऱ्या ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय कार्यक्रम सकाळी 9.05 वाजता आयोजित करण्यात आला आहे. या दिवशी सकाळी 8.35 ते 9.35 या वेळेत ध्वजारोहणाचा किंवा इतर कोणताही शासकीय किंवा निमशासकीय समारंभ आयोजित करण्यात येऊ नये. जर एखाद्या कार्यालयाला अथवा संस्थेला आपला स्वतःचा ध्वजारोहण समारंभ करावयाचा असल्यास त्यांनी तो सकाळी 8.35 वाजेपूर्वी किंवा 9.35 वाजेनंतर आयोजित करावा, अशा सूचना देऊन श्री.चव्हाण म्हणाले की, वर्धापन दिनाचा सोहळा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्व संबंधित विभागांना सोपवलेली जबाबदारी योग्य पध्दतीने पार पाडावी, स्वातंत्र्य दिनी विभाग प्रमुखांनी मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमास उपस्थित रहावे. तसेच मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम स्थळा व्यतिरिक्त इतर ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांचे क्रिडा स्पर्धेचे बक्षीस वाटप, ध्वजवंदनानंतर सलामी समादेशक तसेच एन.सी.सी. जवानांचे एक पथक सज्ज ठेवणे आदी सूचना संबंधित विभागाला श्री.चव्हाण यांनी दिल्या.

समारंभास उपस्थित राहणाऱ्या सर्व व्यक्तींनी राष्ट्रीय पोषाख परिधान करावा. सर्वांसाठी मास्क बंधनकारक आहे. सुरक्षित वावराच्या सर्व नियमाचे काटेकोर पालन करावे व अधिकाधिक नागरिकांना हा सोहळा घरबसल्या पाहता यावा, यासाठी वेबसाइटद्वारे थेट प्रक्षेपण करावे, अशाही सूचना देण्यात आल्या आहेत.

उपायुक्त्‍ (सा.प्र.) जगदीश मनियार, मनपाचे सहायक आयुक्त रवींद्र निकम, उपजिल्हाधिकारी पी.जी.मुळे, यांच्यासह इतर संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.