वैजापूर शहरात आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत समूह राष्ट्रगीत गायन :पाच हजार शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग

वैजापूर,९ ऑगस्ट  /प्रतिनिधी :- क्रांतिदिनी सकाळी अकराला येथील शासकीय अध्यापक विद्यालयाच्या मैदानावर शहरातील सर्व शाळांचे विद्यार्थी यांनी राष्ट्रगीत सामूहिक स्वरूपात सादर करून भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची पूर्वतयारी आरंभ केली. याप्रसंगी या समूह राष्ट्रगीत गायन मध्ये शहरातील सर्व शिक्षक, विविध शासकीय व निमशासकीय कार्यालयाचे प्रमुख, अधिकारी वर्ग व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. अत्यंत शिस्तबद्ध  हा कार्यक्रम झाला.

नगराध्यक्षा शिल्पाताई परदेशी, माजी नगराध्यक्ष साबेरखान यांनी भारतीय स्वातंत्र्याच्या महोत्सवानिमित्त सर्वांना शुभेच्छा देऊन हा उत्सव आनंद व उत्साहात ध्वज नियम पाळून साजरा करावा असे आवाहन केले. आपल्या समारोपात तहसीलदार राहुल गायकवाड यांनी 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या दरम्यान घरोघरी तिरंगा फडकविण्याबाबत सर्व उपस्थिताना सूचना दिल्या व ध्वज सन्मान बाबत सजगता बाळगण्याचे आवाहन केले.सामाजिक कार्यकर्ते धोंडीरामसिंह राजपूत यांनी सुत्रसंचलन केले. पालिकेचे पर्यवेक्षक एम.आर. गणवीर यांनी आभार मानले. याप्रसंगी मुख्याधिकारी भागवत बिघोत, गट शिक्षणाधिकारी हेमंत उशीर, प्रभारी गटविकास अधिकारी एच.आर.बोयनर,तालुका आरोग्य अधिकारी गुरुनाथ इंदुरकर यांच्यासह नगरसेवक,कसामाजिक कार्यकर्ते, शिक्षक, विविध कार्यालयाचे अधिकारी, पत्रकार व कर्मचारी याप्रसंगी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पालिकेचे उप मुख्याधिकारी साठे, स्वछता निरीक्षक प्रमोद निकाळे, विष्णू आलूले, रमेश त्रिभुवन यांनी परिश्रम घेतले.