विविध विभागांतील 80 हजार पदे भरणार, शेतकऱ्यांना आतापर्यंतची सर्वाधिक मदत देणार-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

​मुख्यमंत्री एकनाथ शिंदे​ यांचा विरोधकांवर हल्लाबोल ​

हिंगोली,​८​ ऑगस्ट  /प्रतिनिधी :- राज्यातील विविध विभागांतील 80 हजार पदे येत्या काही दिवसांत भरणार व पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आतापर्यंतची सर्वाधिक मदत देणार, असे आश्‍वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. हिंगोलीतील महात्मा गांधी चौकात आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.जेष्ठ नेते एकनाथ शिंदे हे बंडखोरी करत मुख्यमंत्रिपदावर विराजमान झाल्याने त्यांच्यावर विरोधकांकडून जोरदार टीका केली जात आहे. शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना गद्दार म्हणत त्यांच्यावर टीकास्त्र सोडलं जात आहे. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या विरोधकांचा खरपूस समाचार हिंगोलीतील सभेत घेतला आहे.

Image

यावेळी खासदार हेमंत पाटील, आमदार संतोष बांगर, भाजपचे आमदार तान्हाजी मुटकुळे, आमदार संजय राठोड, आमदार गोपीकिशन बाजोरीया, माजी खासदार ॲड. शिवाजी माने आदी उपस्थित होते.

‘आम्हाला ज्यांनी वेगवेगळी नावे दिली, त्यांना कामामधून उत्तर देणार आहे. जिथे आम्ही जातो, तिथे मोठी गर्दी असते. हेच विरोधकांना उत्तर आहे, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला आहे. 

Image

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रिपदावर विराजमान झाल्यानंतर त्यांनी राज्याचा दौरा सुरू केला आहे. आज मुख्यमंत्री हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावर असताना एका आयोजित सभेत त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. या सभेत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सभेत पुढे म्हणाले, ‘राज्यात मी बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसैनिकाला वाचविण्याचे प्रयत्न करत आहे. त्यात आमदार संतोष बांगर हे एकनाथ शिंदेंचे चेले आहेत. बांगर हे सर्व आमदारांना माझ्याकडे पाठवायचे. देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मला सांगितले की, ‘महाराष्ट्राला पुढे न्या, आमचे केंद्र सरकार तुमच्या पाठिशी आहे’. राज्यातील हजारो कोटी रुपयांचे प्रस्ताव केंद्राला पाठविले आहेत, ते सर्व मंजूर होतील’.

हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नुकसानीवर भाष्य करताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ‘ हिंगोली जिल्ह्यात येत असताना शेतीचे भरपूर नुकसान झालं आहे. ते मी पाहिलेलं आहे. आज पर्यंत या शेतकऱ्यांना मदत मिळाली आहे, त्या पेक्षा जास्त मदत देण्याचा सरकारचा प्रयत्न असणार आहे’.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, राज्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले आहे. ठिकठिकाणी नुकसानीची पाहणी केली आहे. देशाचा अन्नदाता शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत दिली जाईल. राज्यातील विविध विभागांमध्ये मोठ्या संख्येने रिक्तपदे असून आगामी काही दिवसांतच विविध विभागांतील 80 हजार पदे भरली जाईल.

Image

मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवणार

मराठा आरक्षणाचा प्रश्‍न सोडविण्यासाठी न्यायालयात विधीज्ञांची फौज उभी केली जाईल. मराठा समाजाला न्याय देण्याचे काम शिवसेना-भाजपा युतीचे सरकार करणार असल्याचे आश्‍वासन एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिले.

कामातून उत्तर देणार

बंडखोरीबाबत ठाकरे गटाकडून होणाऱ्या टीकेवर शिंदे म्हणाले, मागील एका महिन्यापासून आम्हाला नवनवीन नावे देण्यात आली. मात्र त्याकडे दुर्लक्ष करून आम्ही कामातून त्यांना उत्तर देणार आहोत. राज्यात ठिकठिकाणी जाताना हजारोंच्या संख्येने जनता दुतर्फा उभे राहून प्रसन्न मुद्रेने आमचे स्वागत करताहेत. हेच त्यांना उत्तर आहे.

5 कोटींचा निधी

दरम्यान, कळमनुरी येथील लमाणदेव तिर्थक्षेत्र, आदिवासी भवन यासाठी प्रत्येकी पाच कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा एकनाथ शिंदे केली. तसेच ,औंढा नागनाथ व नर्सी नामदेवच्या विकासासाठी निधी देण्याचे आश्‍वासनही त्यांनी यावेळी दिले. तसेच आमदार संतोष बांगर यांच्या कार्याचे त्यांनी कौतूक केले.