ओबीसी समाजाच्या समस्या दूर करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नवी दिल्ली,​७​ऑगस्ट  /प्रतिनिधी :-ओबीसी समाजाच्या समस्या समजून घेऊन त्या दूर करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

ओबीसी महासंघाचे 7 वे महाअधिवेशन येथील तालकटोरा स्टेडीयम येथे आयोजित करण्यात आले. या सभेस उपमुख्यमंत्री फडणवीस संबोधित करीत होते. या कार्यक्रमास केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील, खासदार बाळू धानोरकर, आमदार डॉ.परिणय फुके, नाना पटोले, राज्यातील ओबीसी समाजाचे नेते बबनराव तायवाडे  तसेच देशभरातील ओबीसी महासंघातील सदस्य, ओबीसी समाजातील लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, महाराष्ट्रात ओबीसी समाजाकरिता स्वतंत्र मंत्रालय सुरू करण्यात आले. त्यावेळी ओबीसी समाजासाठीच्या 21 मागण्या पूर्ण करण्यात आल्या. शिक्षण, वसतीगृह, उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्यासाठी शिष्यवृत्ती, भारतीय प्रशासकीय सेवेच्या स्पर्धा परिक्षार्थीचे प्रशिक्षण वर्ग आदि विषयांबाबतही निर्णय घेऊन ओबीसी समाजातील सर्वच घटकांना लाभ देण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचे श्री.फडणवीस यांनी सांगितले. ओबीसी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आणखी काही मागण्या आल्यास त्याबाबतही सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी आश्वस्त केले. ओबीसी आयोगाला संवैधानिक दर्जा देण्याचे काम केंद्र शासनाने केले असल्याचेही श्री.फडणवीस यांनी यावेळी सांगितले.