वैजापूर कांदा मार्केटमध्ये जुलैअखेर 38 कोटी रुपयांची उन्हाळी कांदा खरेदी

साठवणूक करूनही अपेक्षित भाव नाही ; शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी

जफर ए.खान 

वैजापूर,​७​ ऑगस्ट  :- वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा मार्केटमध्ये यावर्षीच्या उन्हाळ कांदा हंगामात मे ते जुलै 2022 या तीन महिन्याच्या कालावधीत 4 लाख 88 हजार 389.59 क्विंटल कांदा खरेदी करण्यात आला असून खरेदी केलेल्या या कांद्याची किंमत 38 कोटी 32 लाख 81 हजार 046 रुपये इतकी आहे. 


 वैजापूर कांदा मार्केटमध्ये मे 2022 या महिन्यात 1 लाख 15 हजार 969 .97 क्विंटल (5 कोटी 92 लाख 76 हजार 823 रुपये ), जून 2022 या महिन्यात 1 लाख 84 हजार 491.27 क्विंटल (14 कोटी 41 लाख 68 हजार 962 रुपये), तर जुलै 2022 या महिन्यात 1लाख 87 हजार 928.35 क्विंटल (17 कोटी 98 लाख 35 हजार 261 रुपये) असा एकूण 4 लाख 88 हजार 389.59 क्विंटल उन्हाळ कांद्याची खरेदी करण्यात आली. खरेदी करण्यात आलेल्या या कांद्याची एकूण किंमत 38 कोटी 32 लाख 81 हजार 046 रुपये इतकी आहे.खरेदी करण्यात आलेल्या कांद्याला 600 रुपये ते 1100 रुपये सरासरी भाव मिळाला. अधिक भाव 1430 रुपये ते 2100 रुपये तर कमी भाव 300 ते 400 रुपये मिळाला.अशी माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचीव पी.के.मोटे व कांदा मार्केटवर विशेष लक्ष देणारे बाजार समितीचे कर्मचारी चंचल मते यांनी दिली. साठवणूक करूनही अपेक्षित भाव नाही.

शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी

कांद्याला अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात कांदा पिकाने पाणी आणले आहे. कांदा लागवड ते कांदा काढणीपर्यंत 50 ते 55 हजार रुपये प्रति एकरी खर्च शेतकऱ्याला करावा लागतो आणि उत्पादन एकरी 8 ते 9 टन मिळते. कांदा सर्वसाधारणपणे एप्रिल ते मे महिन्यात काढला जातो. चार महिने संभाळूनही कांद्याला अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. अशी व्यथा नांदगाव येथील कांदा उत्पादक शेतकरी खंडू पाटील गाढे यांनी मांडली.