वैजापूर तालुक्यात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव विविध कार्यक्रमाने साजरा करणार प्रशासकीय पातळीवर नियोजन – तहसीलदार राहुल गायकवाड

वैजापूर,​७​ ऑगस्ट  /प्रतिनिधी :-भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त तालुक्यात दिंनाक 8 ते 15 ऑगस्ट दरम्यान विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून यासाठी  प्रशासकीय पातळीवर जय्यत तयारी करण्यात आली केली आहे. या नियोजनाची सविस्तर माहिती तालुका  तहसीलदार राहुल गायकवाड यांनी शनिवारी येथे पत्रकार परिषदेत दिली. 

राष्ट्रीय कार्यक्रम अभूतपूर्व उत्साहात साजरा करण्यासाठी येथील शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था, शैक्षणिक संस्था या कार्यालयातील प्रमुखासह कर्मचारी यांच्याकडे तारीख नुसार कार्यक्रम साजरा करण्याचे नियोजन सोपविण्यात आलेले आहे. नागरिकांचा व्यापक सहभाग नोंदवण्यासाठी शासकीय कार्यालयाच्या विभाग प्रमुखांना सूचना दिल्या आहेत. नागरिकांच्या सहभागातून ” आझादी का अमृत महोत्सव ” हा राष्ट्रीय कार्यक्रम दिमाखदार स्वरुपात साजरा करण्याचे नियोजन प्रशासना मार्फत करण्यात आले असून शहर व ग्रामीण भागात “घर तिथे तिरंगा ध्वज” या कार्यक्रमासोबतच  सामाजिक, पर्यावरण, सांस्कृतिक, क्रीडा, कृषी व्यवस्थापन, महिला बचत गट, स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान, हुतात्मा स्मारकांची सजावट आदी भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. 

8 ऑगस्टला पंचायत समिती मार्फत तालुक्यातील135 ग्रामपंचायत पातळीवर विशेष  ग्रामसभा आयोजित केली आहे. ग्रामसभेत ई – पीक पाहणी प्रक्रियेसाठी कृषी सहाय्यक प्रात्याक्षिके सादर करतील. स्वातंत्र्य लढ्यातील सैनिकांचा गौरव, तलाठी आणि मतदान नोंदणी अधिकारी ग्रामसभेत मतदार यादीतील नावे आधार क्रमांकाशी जोडण्याचे काम करतील. या कामात सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, रास्त भाव दुकान चालक यांचे नाव मतदार यादीशी आधार लिंक करणे.नगरपलिकेला 9 ऑगस्ट रोजी शहरात विविध ठिकाणी सकाळी अकराला सामूहिक राष्ट्रगीत  गायनाचे नियोजन दिले आहे.14 ऑगस्ट रोजी विनायकराव पाटील महाविद्यालयात वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या राष्ट्रीय कार्यक्रमात नागरिकांनी उस्फूर्तपणे सहभागी व्हावे असे आवाहन तहसीलदार राहुल गायकवाड यांनी केले आहे.