सरकार गेल्यावरही माजी मंत्र्यांना बंगल्याचा मोह सोडवेना!

मुंबई ,६ ऑगस्ट  /प्रतिनिधी :- महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार जाऊन शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले आहे. या सरकारचा मंत्रिमंडळ विस्ताराचा कार्यक्रम रखडला आहे. महाविकास आघाडीचे सरकार जाऊन महिन्यापेक्षा जास्त कालावधी उलटून गेला आहे. मात्र तरीही तत्कालीन सरकारमधील अनेक मंत्र्यांनी अद्यापही आपले सरकारी बंगले रिकामे केलेले नाहीत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित असणाऱ्या मंत्र्यांच्या एकूण ४० बंगल्यांपैकी फक्त १८ बंगले रिकामे झाले आहेत.

अद्याप १३ माजी मंत्र्यांनी आणि एका माजी अधिकाऱ्याने हे बंगले सोडलेले नाहीत. विशेष म्हणजे या रिकाम्या न झालेल्या १४ बंगल्यांमध्ये शिंदे गटात सामील झालेल्या अनेक माजी मंत्र्यांचा समावेश आहे. नियमानुसार मंत्रिमंडळ बरखास्त झाल्यानंतर १५ दिवसांच्या कालावधीत हे बंगले रिक्त करावे लागतात. मात्र ठाकरे सरकार पायउतार झाल्याच्या घटनेला महिना उलटूनही अद्याप सार्वजनिक बांधकाम विभागाचे १४ बंगले रिकामे झालेले नाहीत.

मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नसल्याने बंगल्यांचा प्रश्न तसा उपस्थित झालेला नाही. मात्र आता कुठल्याही क्षणी विस्तार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता हे माजी मंत्री बंगले खाली कधी करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. विशेष म्हणजे महाविकास आघाडी सरकारमध्ये मुख्यमंत्री असलेले उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याआधी वर्षा हे शासकीय निवासस्थान रिकामे केले होते.

या माजी मंत्र्यांकडे आजही बंगल्यांचा ताबा

धनजंय मुंडे, छगन भुजबळ, जयंत पाटील, अशोक चव्हाण, जितेंद्र आव्हाड, दादाजी भुसे, विजय वडेट्टीवार, उदय सामंत, हसन मुश्रीफ, गुलाबराव पाटील, संदिपान भुमरे, बाळासाहेब पाटील, नाना पटोले (माजी विधानसभा अध्यक्ष), सीताराम कुंटे (माजी अधिकारी).