काँग्रेसचे देशव्यापी आंदोलन:राहुल गांधीसह प्रियंका गांधी पोलिसांच्या ताब्यात

नवी दिल्ली : काँग्रेसने महागाई आणि बेरोजगारीविरोधात आज देशव्यापी आंदोलन छेडले. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात देशव्यापी आंदोलनादरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले. दिल्लीमध्ये राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी काळे कपडे परिधान करत महागाई आणि बेरोजगारीवरून केंद्र सरकारचा निषेध केला. या आंदोलनात काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनीही सहभाग घेतला.

Image

दिल्ली, मुंबई, नागपूरसह देशभरात काँग्रेस कार्यकर्त्यांकडून केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करत निषेध करण्यात आला. यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेसचा संसद भवन ते राष्ट्रपती भवन असा मोर्चा निघणार होता. पण दिल्ली पोलिसांनी काँग्रेसचा हा मोर्चा रोखला आणि आंदोलक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. यावेळी दिल्ली पोलिसांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना ताब्यात घेतले. यानंतर काँग्रेस कार्यकर्ते अधिकच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.

Image

राष्ट्रपती भवनाला घेराव, पंतप्रधान मोदींच्या घरावर मोर्चा

नॅशनल हेराल्ड प्रकरणात सध्या गांधी परिवाराची ईडी चौकशी सुरू आहे. या दरम्यान आज काँग्रेसने वाढती महागाई आणि बेरोजगारीच्या विरोधात देशव्यापी आंदोलन छेडले आहे. राजधानी दिल्लीमध्ये काँग्रेसने पंतप्रधान निवास आणि राष्ट्रपती भवनाला घेराव घालण्याचा प्रयत्न केला. मात्र दिल्ली पोलिसांनी आंदोलकांना अडवले असून काँग्रेसचे काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.

काँग्रेसच्या या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत जंतरमंतर वगळता इतर सर्व ठिकाणी कलम १४४ लागू करण्यात आले आहे. तर या आंदोलनाबद्दल काँग्रेस ऑफिसच्या बाहेरही पोस्टर्स लावण्यात आले आहेत.

त्याआधी झालेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्या ईडी चौकशीवरून मोदी सरकारवर चांगलाच हल्लाबोल केला. आपण पंतप्रधान मोदींना घाबरत नाही आणि धमकावून आपला आवाज दाबला जाऊ शकणार नाही, असे ते म्हणाले.

ईडीने आर्थिक घोटाळ्याप्रकरणी बुधवारी दिल्लीतले नॅशनल हेराल्ड कार्यालयातला यंग इंडियन कंपनीचा परिसर सील केला आहे. तर काँग्रसेने दावा केला आहे की, दिल्ली पोलिसांनी त्यांचे मुख्यालय आणि सोनिया गांधी, राहुल गांधीच्या घराभोवती वेढा घातला आहे.

Image

काँग्रेसचे देशव्यापी आंदोलन

काँग्रेसने महागाई, महागाई, जीएसटी, तपास यंत्रणाचा गैरवापर आणि बेरोजगारीविरोधात आज देशव्यापी आंदोलन छेडले आहे. काँग्रेस कार्यकर्ते देशभरात सर्वत्र निदर्शने करत आहेत. राष्ट्रीय राजधानीत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींसह सर्वच मोठे नेते रस्त्यावर उतरले आहेत. यासाठी पक्षाने द्विस्तरीय रणनीती तयार केली आहे. वाढता रोष पहाता दिल्लीत जमावबंदी लागू करण्याच आली आहे.

गुरुवारी रात्री उशिरा काँग्रेस मुख्यालयाबाहेर मोठ्या प्रमाणात सुरक्षा जवान तैनात करण्यात आलेत. यामुळे मुख्यालयाला छावणीचे स्वरुप प्राप्त झाले आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी रात्रीपासूनच आपल्या मुख्यालयापुढे डेरा टाकला आहे. या कार्यकर्त्यांची सरकारविरोधात जोरदार नारेबाजी सुरू आहे. राजस्थान, छत्तीसगड, हरियाणा व यूपीमधील कार्यकर्ते दिल्लीत पोहोचले आहेत.

Image

दिल्लीसह मुंबई आणि नागपुरातही काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. मुंबई आणि नागपूरमध्येही पोलिसांनी काँग्रेस कार्यकर्त्यांची धरपकड सुरु केली. मुंबईतही पोलिसांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. मुंबईत पोलिसांनी नाना पटोले यांना ताब्यात घेतले. याशिवाय पुण्यातही काँग्रेस नेत्यांची धरपकड करण्यात आली.

काँग्रेसने महागाई आणि बेरोजगारीबाबत केंद्रातील केंद्र सरकारवर आक्रमक भूमिका घेतली आहे. या आंदोलनाआधी राहुल गांधी यांनी माध्यमांशी संवाद साधला.