संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊतांना ईडीचे समन्स

मुंबई : पत्रा चाळ प्रकरणात शिवसेना नेते संजय राऊत हे ईडीच्या कोठडीत असताना संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना देखील मनी लाँड्रिंग प्रकरणात समन्स पाठवण्यात आले आहे.

पत्रा चाळ प्रकरणात संजय राऊत यांच्या अडचणी संपताना दिसत नाहीत. आज संजय राऊत यांना आठ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. यादरम्यान पत्रा चाळ जमीन प्रकरणातील मनी लाँड्रिंग प्रकरणी संजय राऊत यांची पत्नी वर्षा राऊत यांना देखील ईडीने आज समन्स बजावला आहे. वर्षा राऊत यांच्या खात्यावर काही व्यवहार झाल्याचे उघडकीस आल्यानंतर ईडीने त्यांच्या नावे समन्स जारी केले आहे.

दरम्यान संजय राऊत यांना कोर्टाकडून कोणताही दिलासा मिळालेला नाही. त्यांच्या कोठडीत आणखी चार दिवसांची वाढ करण्यात आली असून त्यांना पुन्हा ८ ऑगस्टपर्यंत कोठडी सुनावण्यात आली. पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीने संजय राऊत यांना ३१ जुलै रोजी अटक केली होती. त्यानंतर आज ही कोठडी संपल्याने राऊत यांना पुन्हा कोर्टात हजर करण्यात आले होते. पीएमएलए कोर्टात हजर केले असता त्यांना ४ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली.