मालदीवच्या अध्यक्षांची जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाला भेट

अलिबाग,४ ऑगस्ट  /प्रतिनिधी :- मालदीव प्रजासत्ताकचे अध्यक्ष इब्राहिम मोहम्मद सोलिह यांनी मालदीव प्रजासत्ताकातील वरिष्ठ मान्यवरांसह भारतातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाला (जेएनपीए) भेट दिली.

जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाचे अध्यक्ष भारतीय प्रशासन सेवेतील वरिष्ठ अधिकारी संजय सेठी यांनी मालदीव प्रजासत्ताकचे अध्यक्ष महामहिम इब्राहिम मोहम्मद सोलिह यांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत केले. याप्रसंगी रायगड जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर, जेएनपीए चे उपाध्यक्ष उन्मेष शरद वाघ, नवी मुंबई पोलीस आयुक्त बिपिन कुमार सिंह, उपायुक्त शिवराज पाटील, उपायुक्त पुरुषोत्तम कराड, उपायुक्त रुपाली अंबुरे व जेएनपीए चे सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.

यावेळी मालदीव प्रजासत्ताकचे अध्यक्ष इब्राहिम मोहम्मद सोलिह यांना जेएनपीए चे अध्यक्ष श्री.संजय सेठी यांनी जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणामधील विविध प्रकल्पांची माहिती दिली. जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण (जेएनपीए) च्या नवीन विकासात्मक प्रकल्पांबाबत ते म्हणाले की, भारत सरकारच्या जहाजबांधणी मंत्रालयाच्या दूरदृष्टीनुसार जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाने वाढवण येथील ग्रीनफील्ड बंदराचा विकास, राज्याच्या मध्यवर्ती भागातील ड्राय पोर्ट, फोर्थ कंटेनर टर्मिनल इ. प्रकल्प हाती घेतले आहेत. हे प्रकल्प देशाच्या वाढत्या अर्थव्यवस्थेला हातभार लावतील.

या भेटीप्रसंगी अध्यक्ष इब्राहिम मोहम्मद सोलिह यांनी बंदराच्या एकूण कामकाजाबाबतची माहिती जाणून घेतली तसेच एका टर्मिनलला भेट देऊन तेथील प्रत्यक्ष काम कसे चालते, याचे प्रात्यक्षिकही बघितले.

जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाबद्दल:

नवी मुंबई येथील जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण (JNPA) हे भारतातील प्रमुख कंटेनर हाताळणी करणाऱ्या बंदरांपैकी एक आहे. हे बंदर दि.26 मे 1989 रोजी कार्यान्वित करण्यात आले. तीन दशकांहून कमी कालावधीत, जेएनपीए बल्क-कार्गो टर्मिनलमधून देशातील प्रमुख कंटेनर बंदर म्हणून विकसित झाले आहे.

सध्या जेएनपीए पाच कंटेनर टर्मिनल चालवते: जवाहरलाल नेहरू पोर्ट कंटेनर टर्मिनल (JNPCT) न्हावा शेवा इंटरनॅशनल कंटेनर टर्मिनल (NSICT), गेटवे टर्मिनल्स इंडिया प्रा. लिमिटेड (GTIPL), न्हावा शेवा इंटरनॅशनल गेटवे टर्मिनल (NSIGT) आणि नव्याने सुरू झालेले भारत मुंबई कंटेनर टर्मिनल्स प्रायव्हेट लिमिटेड (BMCTPL). बंदरात सामान्य मालवाहतूक करण्यासाठी उथळ पाण्याचा बर्थ आणि दुसरा लिक्विड कार्गो टर्मिनल आहे, जो BPCL-IOCL कन्सोर्टियम आणि नव्याने बांधलेला किनारपट्टी बर्थ द्वारे व्यवस्थापित केला जातो.