डॉ. शंकरराव चव्हाण शासकिय वैद्यकिय रुग्णालयातून गंभीर आजारी असलेल्या 14 कोरोना बाधित रुग्णांवर यशस्वी औषधोपचार

नांदेड दि. 2 :- जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती लक्षात घेता डॉ. शंकरराव चव्हाण शासकिय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालयातील दोनशेपेक्षा अधिक निवासी डॉक्टर्स व वैद्यकिय शिक्षक, नर्सेस-इतर कर्मचारी येणारी आव्हाने स्विकारण्यासाठी तत्पर असून उपचारासाठी येथे दाखल होणाऱ्या प्रत्येक रुग्णांसाठी आम्ही सिद्ध असल्याचे अधिष्ठाता डॉ. सुधिर देशमुख यांनी सांगितले. आज इतर आजारांसह कोरोनामुळे अतिगंभीर आजारी असलेल्या 14 रुग्णांवर यशस्वी औषधोपचार करुन त्यांना बरे झाल्यामुळे रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

यात 60 वर्षापेक्षा अधिक अशा रुग्णांचा समावेश आहे. यातील एक 72 वर्षीय वयोवृद्ध 12 दिवस व्हेंटिलेटरवर राहून 33 दिवसानंतर मृत्यूशी जिंकून आता बरे होऊन घरी जात असल्याचे आम्हा सर्व टिमला आनंद असल्याचे ते म्हणाले. आम्ही येथे दाखल होणाऱ्या प्रत्येक कोविड रुग्णांकडे अधिकाधिक लक्ष केंद्रित केले असून याचबरोबर कोविड व्यतीरिक्त जे काही आजार आहेत त्यासंदर्भात येणाऱ्या प्रत्येक रुग्णांकडे तेवढीच दक्षता घेतली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आज डिस्चार्ज देण्यात आलेल्या व्यक्तींमध्ये 4 डॉक्टर्स होते त्यांनी न्युमोनियावर मात केली आहे. महाविद्यालयाचे औषोध वैद्यकशास्त्र विभागाचे डॉ. भुरके, डॉ. शितल राठोड व डॉ. अंजली देशमुख यांच्या पथकातील सर्व सदस्यांनी पूर्ण समर्पणभावाने ही जबाबदारी स्विकारल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

मागील आठवड्यापासून कोविड केअर सेंटरमधून रुग्णांचे बरे होऊन डिस्चार्जचे प्रमाणही सुधारले असून रुग्णांमध्ये अधिक सकारात्मक मानसिकता निर्माण यावरही आम्ही भर दिल्याचे ते म्हणाले. सद्यस्थितीत कोविडची 250 व इतर आजारांसाठी 400 बेडस् असे एकुण 650 पेक्षा अधिक बेडस् वैद्यकिय सुविधांसह आम्ही तत्पर ठेवण्यावर भर दिला आहे. रुग्णांनी आत्मविश्वासपूर्वक स्वत:ची सकारात्मक मानसिकता ठेवून आपल्या आजाराकडे पाहिल्यास आजारावर आपल्याला लवकर मात करता येते हेही आपण लक्षात घेतले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *