वैजापूर तालुक्यातील 20 हजार 116 शेतकऱ्यांना अतिरिक्त पीककर्ज योजनेचा लाभ मिळणार – डॉ.दिनेश परदेशी

वैजापूर,४ ऑगस्ट  /प्रतिनिधी :- अल्प मुदत कर्जाची नियमित परतफेड करणा-या विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या कर्जदार सभासद शेतक-यांसाठी अतिरिक्त 20 टक्के पीककर्ज रकमेचा लाभ देण्याचा महत्वपूर्ण निर्णय जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाने घेतला आहे. या निर्णयामुळे 12 कोटी 73 लाख रुपये अतिरिक्त कर्ज रक्कमेचा लाभ 20 हजार 116 शेतक-यांना दिला जाणार आहे. अशी माहिती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक डॉ.दिनेश परदेशी यांनी दिली.
बँकेच्या शाखेतून आर्थिक रक्कम काढण्यासाठी ग्राहकांना येथील मुख्य शाखेत एटीएम सुविधा कार्यान्वित करण्यात आली आहे. 2022 -2023 या आर्थिक वर्षात  जिल्हा बँकेच्या पंधरा शाखांमार्फत  115 सोसायटीचे 23 हजार 607 सभासदांना 71 कोटी 71 लाखाचे अल्पमुदतीचे कर्ज वाटप केले होते. त्यापैकी तीन हजार 491 शेतक-यांचे कर्ज खाते थकबाकीत गेले. मात्र यातील 20 हजार 116 कर्जदारांनी 63 कोटी 68 लाखांचे मुद्दल व व्याजाची परतफेड वेळेत केली. या क्रियाशील कर्जदार शेतक-यांच्या अल्पमुदत कर्ज खात्यात 20 टक्के कर्ज  रक्कम वाढण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील शिंदे – फडणवीस सरकारने बाजार समिती संचालकांच्या निवडणुकीत विकास सोसायटी संचालकाऐवजी शेतक-यांना मतदानाचा अधिकार दिल्यामुळे बॅंंकेने पीककर्ज रक्कमेत वाढ करण्याचा निर्णय घेतला असावा अशी चर्चा आहे. शेतक-यांना वाढीव कर्जपुरवठा करण्याची अंमलबजावणी मोहीम सुरु हाेणार असल्याची माहिती जिल्हा बँकेचे संचालक डॉ.दिनेश परदेशी यांनी दिली. सोसायटीचे चेअरमन आणि गटसचिव यांच्याकडून मागणी आल्यानंतर कर्जदार सभासदांना कर्ज खाते नूतनीकरणावेळी दिलेली मुद्दल रक्कमेत वीस टक्के अतिरिक्त वाढ केली जाईल. या संदर्भात गट सचिवांना सूचना दिल्याचे बँकेचे संचालक डॉ.दिनेश परदेशी व तालुका कर्ज वितरण अधिकारी ए.जी.उगले यांनी सांगितले. 
बँकेचे शाखानिहाय पात्र लाभार्थी —-मार्केटयार्ड शाखा 2 हजार 704 सभासद, कर्ज रक्कम, 769, लाडगाव शाखा 1 हजार 405 सभासद, कर्ज रक्कम 456, वीरगाव शाखा  777 सभासद, रक्कम 230.09, महालगाव 1 हजार 182 सभासद, 394.99, पालखेड 657 सभासद, रक्कम 200.85, दहेगाव 907 सभासद, 298.85, परसोडा सभासद 695, रक्कम 213.93, धोंदलगाव 830 सभासद, रक्कम 290.01, लासूरगाव 523 सभासद, रक्कम 185.46, गारज 848 कर्ज रक्कम 298.59, मनूर 726 सभासद कर्ज रक्कम 261.82, शिऊर 2 हजार 193 सभासद कर्ज रक्कम 725.90, लोणीखुर्द 2 हजार 527 सभासद कर्ज रक्कम 788.54, खंडाळा 3 हजार 426 कर्ज रक्कम 1058.14, माळीघोगरगाव 716 सभासद कर्ज रक्कम 195.99
…शेतक-यांच्या वाढीच्या मागणीला प्रतिसाद – डॉ.दिनेश परदेशी
जिल्हा बँकेकडून पीक उत्पादक शेतकऱ्यांकडून कर्ज रक्कमेत वाढीची मागणी मोठया प्रमाणात होती.तालुक्यात जवळपास 25 हजार शेतक-यांना पीक कर्ज वाटप केले आहे.पीक कर्जाची वेळेवर परतफेड करणा-या 20 हजार 116 सभासदांना खरीपासाठी 12 कोटी 73 लाखांचे वाढीव कर्ज वितरण करण्यात येईल असे जिल्हा बँकेचे संचालक डॉ.दिनेश परदेशी यांनी सांगितले.