पानसरे हत्याप्रकरणाचा तपास दहशतवाद विरोधी पथकाकडे : मुंबई उच्च न्यायालय

मुंबई ,३ ऑगस्ट  /प्रतिनिधी :- कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणाचा बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या परवानगीने एसआयटीकडून तपास दहशतवाद विरोधी पथकाकडे (एटीएस) सुपूर्द करण्यात आला आहे. एसआयटीला अपेक्षित यश येत नसल्याने कुटुंबियांनी विनंती केली होती. पानसरे कुटुंबियांनी याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. एसआयटीतील काही अधिकारी एटीएसला तपासात सहकार्य करणार आहे.

१६ फेब्रुवारी २०१५ मध्ये कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉम्रेड गोविंद पानसरे यांची कोल्हापुरात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. कोल्हापूरातील या प्रकरणाच्या तपसा करण्यासाठी सरकारकडून विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापना करण्यात आली होती. मात्र इतकी वर्ष तपास करूनही एसआयटीच्या हाती काहीच लागलेले नाही, त्यामुळे एसआयटीच्या तपासबाबत असमाधानी असलेल्या पानसरे कुटुंबीयांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. आज या प्रकरणावर सुनावणी झाली असून आता तपास एटीएसकडे सोपवण्यात आला आहे.

न्यायाधीश रेवती मोहिते डेरे आणि न्यायाधीश शर्मिला देशमुख यांच्या खंडपीठाने म्हटले की, पानसरे यांच्या कुटुंबियांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी झाली. कॉम्रेड गोविंद पानसरे हत्याप्रकरणाचा तपास एटीएसकडे सोपवण्यात आला आहे. सात वर्षांपासून या प्रकरणाच्या तपासात एसआयटीला अपेक्षित यश येत नसल्याने पानसरे कुटुंबीयांनी प्रकरण एटीएसकडे सोपवण्याची विनंती केली होती. ही विनंती मान्य केली आहे.

सात वर्षांनंतर देखील तपासात यश येत नव्हते, अनेक दिवसांपासून याबाबत आम्ही मागणी करत होतो. आता हा तपास एटीएसकडे सोपवण्यात आला आहे, त्यामुळे अपेक्षा आहेत की हल्लेखोर सापडतील, अशी प्रतिक्रिया मेघा पानसरे यांनी दिली. सरकारने या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहणे खूप गरजेचे आहे. एटीएसकडे हा तपास दिल्याने याचा तपास गतिमान होईल अशी आशा आहे, असेही मेघा पानसरे म्हणाल्या.