उस्मानाबादेत कोरोनाला रोखण्यासाठी समाजातील दानशूर व्यक्ती करणार खर्च

पालकमंत्री शंकरराव गडाख यांच्या पुढाकाराने राज्यात प्रथमच असा नाविन्यपूर्ण उपक्रम; मुस्लिम समाजातील नागरिकांना मोठा दिलासा

मुंबई, दि.२ : उस्मानाबाद शहरातील ख्वाजानगर, दिल्ली कॉलनी खिरणी मळा, गालिब नगर भागात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रुग्ण आढळत असल्याने प्रशासनावरचा वाढता ताण पाहून पालकमंत्री शंकरराव गडाख यांच्या पुढाकाराने मुस्लिम समाज बांधवांनी शहरातील दोन मदरसे रुग्णांना क्वॉरंटाइन करण्यासाठी उपलब्ध केले आहेत. तसेच सोमवारपासून चार मोहल्ला क्लिनिक सुरू करून उपचार सेवाही देण्यात येणार असल्याने राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री शंकरराव गडाख यांचे समाजाच्या वतीने आभार मानण्यात आले.

श्री.गडाख माहिती देतांना म्हणाले शहरातील मिनार मशिदीजवळ असलेल्या दारूल उलूम मदरशात महिलांसाठी क्वॉरंटाइन केंद्र सुरू करण्यात आले आहे. येथे २६ महिलांना क्वारंटाइनही करण्यात  आले आहे. तसेच संत ज्ञानेश्वर मंदिरासमोर उर्दू मदरशात १०० पुरुषांसाठी क्वॉरंटाइन केंद्र सुरू झाले असून तेथे १६ पुरुषांना दाखल करण्यात आले आहे. संपर्कातील व्यक्ती पासून प्रसार रोखण्यासाठी बाहेरील व्यक्तींना प्रवेशापासून रोखण्यासाठी दरवाजावर सुरक्षा   रक्षकांचीही नेमणूक करण्यात आली आहे.

कोविड केअर सेंटरमध्ये तज्ज्ञ डॉक्टर दररोज दोन तासांची सेवा देणार

कोरोना रुग्णांवर उपचारांसाठी सहारा प्रशालेत ५० खाटांचे कोविड केअर सेंटर सुरू होत आहे. सर्व खर्चही समाजाच्या वतीनेच उचलण्यात येणार आहे. तज्ज्ञ डॉक्टर दररोज दोन तासांची सेवा देणार असल्याचे श्री.गडाख यांनी सांगितले.

कोरोनासह सर्व प्रकारच्या रुग्णांवर होणार उपचार

अँटिजेन किट्सद्वारे तपासणी होईल. साधा ताप-सर्दी सह इतर रुग्णांवरही त्यांच्या घरात वा क्लिनिकमध्ये उपचार होतील. कोरोनाच्या भीतीने सर्वसामान्य रुग्णांनाही उपचार नाकारण्याचा प्रकार होत आहे. त्यासाठी मोहल्ला क्लिनिक सुरू होत आहे. तसेच समाजातील १५ फार्मासिस्ट सेवा देणार आहेत.

मोहल्ला क्लिनिकमध्ये समाजातील डॉक्टर तसेच लॅब टेक्निशियन व सहाय्यक मोफत सेवा देण्यासाठी तयार

मुस्लिम समाजातील दानशूर व्यक्तींच्या सहकार्यातून मोहल्ला क्लिनिक सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.या नावीन्यपूर्ण उपक्रमाने श्री.गडाख यांनी समाज बांधवांचे कौतुक केले. ख्वाजा नगर, खिरणी मळा परिसरात तीन, गालिबनगर व मिल्ली कॉलनीसाठी एक क्लिनिक सुरू करण्यात येणार आहे. यामध्ये समाजातील डॉक्टर तसेच लॅब टेक्निशियन व सहाय्यक मोफत सेवा देण्यासाठी तयार झाले आहेत. प्रत्येक क्लिनिकमध्ये प्रत्येकी चार डॉक्टर व दोन सहाय्यक सेवा देणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *