राऊतांचा पत्रा चाळ घोटाळा काय आहे?

Patra Chawl redevelopment scam: ED attaches properties owned by Sanjay  Raut's wife | Mumbai news - Hindustan Times

मुंबई : मुंबईतील १,०३९ कोटींच्या पत्रा चाळ जमीन घोटाळ्याप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांना रविवारी ईडीने ९ तासांच्या चौकशीनंतर ताब्यात घेतले आणि मध्यरात्री अटक केली आहे. यापूर्वी २८ जून रोजीही राऊत यांची ईडीने चौकशी केली होती. अटकेपूर्वी राऊत यांनी माझा कोणत्याही घोटाळ्याशी संबंध नसून मी शिवसेनेसाठी लढत राहणार असे म्हटले आहे.

रविवारी संजय राऊत यांच्या घराची झडती घेतली असता ईडीला ११.५० लाख रुपयांची रोकड सापडली आहे. राऊत किंवा त्यांच्या कुटुंबाला मिळालेल्या रकमेची अधिकृत माहिती देता आली नाही.

उत्तर मुंबईतील गोरेगाव येथे सिद्धार्थ नगर आहे, ते पत्रा चाळ म्हणून प्रसिद्ध आहे. येथे ४७ एकरमध्ये ६७२ घरे आहेत. २००८ मध्ये महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाने (म्हाडा) पुनर्विकास प्रकल्प सुरू केला आणि ६७२ भाडेकरूंचे पुनर्वसन आणि क्षेत्राचा पुनर्विकास करण्याचा करार गुरु आशिष कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेडला दिले.

त्रिपक्षीय करारानुसार, गुरु आशिष कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड पत्रा चाळीमधील ६७२ भाडेकरूंना फ्लॅट, म्हाडासाठी ३ हजार फ्लॅट दिले जाणार होते.

मात्र, संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत आणि गुरु आशिष कन्स्ट्रक्शनच्या अन्य संचालकांनी म्हाडाची दिशाभूल केल्याचा ईडीचा दावा आहे. तसेच ९ वेगवेगळ्या खाजगी विकासकांना फ्लोअर स्पेस इंडेक्स म्हणजेच एफएसआय विकून ९०१.७९ कोटी रुपये कमावले, परंतु त्यांनी ६७२ भाडेकरूंना फ्लॅट दिले नाहीत किंवा म्हाडासाठी कोणतेही फ्लॅट बांधले नाहीत.

यानंतर गुरु आशिष कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेडने Meadows नावाचा प्रकल्प सुरू केला आणि फ्लॅट खरेदीदारांकडून सुमारे १३८ कोटी रुपयांची बुकिंग रक्कम घेतली. गुरु आशिष कन्स्ट्रक्शनने या बेकायदेशीर कामांमधून १,०३९.७९ कोटी रुपये कमावल्याचा ईडीचा आरोप आहे.

प्रवीण राऊत यांना रिअल इस्टेट कंपनी एचडीआयएलकडून १०० कोटी रुपये मिळाल्याचा दावा ईडीने केला आहे. प्रवीण यांनी ही रक्कम त्यांचे जवळचे सहकारी, कुटुंबातील सदस्य आणि संजय राऊत यांच्या कुटुंबीयांना दिली.

२०१० मध्ये संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यावर ८३ लाख रुपये पाठवण्यात आल्याचा आरोप ईडीने केला आहे. या रकमेतून त्यांनी दादरमध्ये फ्लॅट खरेदी केला. याशिवाय महाराष्ट्रातील अलिबागमधील किहीम बीचवर वर्षा राऊत आणि स्वप्ना पाटकर यांच्या नावावर किमान ८ प्लॉट खरेदी केल्याचा दावा ईडीने केला आहे.

स्वप्ना या संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांच्या पत्नी आहेत. या जमिनीच्या व्यवहारात रोख रक्कमही देण्यात आली होती. ईडीने सांगितले की, या मालमत्तेची ओळख पटल्यानंतर प्रवीण राऊत आणि त्यांच्या साथीदारांच्या या सर्व मालमत्ता जप्त करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.

करारानुसार, डेव्हलपरने प्रकल्प पूर्ण होईपर्यंत सर्व ६७२ भाडेकरूंना दरमहा भाडे द्यायचे होते. मात्र, २०१४-१५ पर्यंतच भाड्याचे पैसे देण्यात आले. त्यानंतर भाडेकरूंनी भाडे न देणे आणि प्रकल्प पूर्ण होण्यास विलंब होत असल्याच्या तक्रारी सुरू केल्या.

दरम्यान, प्रवीण राऊत आणि गुरु आशिष कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेडलाच्या इतर संचालकांनी म्हाडाची दिशाभूल करून ६७२ भाडेकरूंना किंवा म्हाडाला फ्लॅट न देता ९ खासगी डेव्हलपर्सना फ्लॅट विकल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर गुरु आशिष कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेडने Meadows नावाचा प्रकल्प सुरू केला आणि फ्लॅट खरेदीदारांकडून सुमारे १३८ कोटी रुपयांची बुकिंग रक्कम घेतली.

म्हाडाने १२ जानेवारी २०१८ रोजी भाडे न भरल्याने, प्रकल्पात विलंब आणि अनियमितता यामुळे डेव्हलपरला निलंबनाची नोटीस बजावली. या नोटिशीनंतर गुरु आशिष कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेडकडून एफएसआय घेतलेल्या ९ डेव्हलपर्सने उच्च न्यायालयात धाव घेतली. यानंतर प्रकल्प रखडला आणि तेव्हापासून ६७२ भाडेकरूंचे भवितव्य टांगणीला लागले आहे.

२०२० मध्ये, महाराष्ट्र सरकारने ६७२ भाडेकरूंचे पुनर्वसन करण्यासाठी आणि भाडे भरण्यासाठी तोडगा काढण्यासाठी महाराष्ट्राचे निवृत्त मुख्य सचिव जॉनी जोसेफ यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्यीय समिती स्थापन केली.

समितीच्या शिफारशी आणि म्हाडाच्या अभिप्रायानंतर, राज्य मंत्रिमंडळाने जून २०२१ मध्ये पत्रा चाळ पुनर्विकास प्रकल्पाला पुन्हा मान्यता दिली. यावर्षी २२ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार रखडलेले बांधकाम पुन्हा सुरू करण्यात आले.

आता म्हाडा स्वतः विकासक म्हणून हा प्रकल्प पूर्ण करणार असून ६७२ भाडेकरूंना फ्लॅटचा ताबा देणार आहे.

याप्रकरणी १ जुलै रोजी संजय राऊत यांची १० तास चौकशी करण्यात आली होती. यादरम्यान मनी लाँडरिंग कायद्यांतर्गत राऊत यांचा जबाब नोंदवण्यात आला.

एप्रिलमध्ये ईडीने वर्षा राऊत आणि त्यांच्या दोन साथीदारांची ११.१५ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती. यामध्ये अलिबागचे ८ प्लॉट आणि दादर, मुंबई येथील फ्लॅट देखील जप्त करण्यात आले. यामध्ये प्रवीण राऊत यांच्याकडे ९ कोटींची तर संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा यांच्याकडे २ कोटींची संपत्ती आहे.

या वर्षी फेब्रुवारीमध्ये पत्रा चाळ प्रकरणी ईडीने प्रवीण राऊत यांना अटक केली होती. ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.