ISIS कनेक्शनवरून देशभरात एनआयए कडून छापेमारी; नांदेड आणि कोल्हापूरचाही समावेश

नवी दिल्ली,३१ जुलै /प्रतिनिधी :- राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) कडून दहशतवादी संघटना ISIS च्या कनेक्शनच्या संशयातून देशभरात छापेमारी सुरू आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील नांदेड आणि कोल्हापूर या शहरांचा सामावेश आहे. आज एनआयए कडून देशभरातील सहा राज्यांमध्ये १३ संशयितांच्या घरांची झडती घेण्यात आली आहे. कारवाईत मोठ्या प्रमाणात कागदपत्रे, साहित्य जप्त करण्यात आले आहे. यामध्ये राज्यातील कोल्हापूर आणि नांदेड जिल्ह्याचा समावेश आहे.

महाराष्ट्रातील नांदेड आणि कोल्हापूरमध्ये ही छापेमारी सुरू असून या कारवाईमध्ये ज्या लोकांचा ISIS या दहशतवादी संघटनेशी संबंध आहे त्यांना ताब्यात घेण्यात आले असून यामध्ये संशयितांकडून नवीन मुलांना या संघटनेत सहभागी करणे, त्यांची दिशाभूल करणे असे कामे केले जात होते. या संशयित लोकांकडून देशविरोधी कृत्य करण्याची योजना होती, यातून काही घातपात घडवण्याच्या योजनेला राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून सुरूंग लावण्यात आला आहे. यामध्ये अनेक लोकांना ताब्यात घेण्यात आले असून काही लोकांना अटक करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

एनआयएने मोठी कारवाई करताना मध्य प्रदेशातील भोपाळ आणि रायसेन, गुजरातमधील भरूच, सुरत, नवसारी आणि अहमदाबाद, बिहारमधील अररिया, कर्नाटकातील भटकळ आणि तुमकूरमध्ये छापेमारी केली. उत्तर प्रदेशातील देवबंद जिल्ह्यांमध्ये ISIS च्या कारवायांशी संबंधित छापेमारी करण्यात आली.