बोलताना काळजी घ्या:मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांचे टोचले कान

नाशिक/मुंबई : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे विधान वैयक्तिक आहे. त्यामुळे आम्ही शिवसेना म्हणून राज्यपालांच्या मताशी सहमत नाही. मराठी लोकांचे मुंबईसाठी मोठे योगदान आहे. त्यामुळे मराठी माणसांचे योगदान कोणालाही नाकारता येणार नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

राज्यपाल म्हणजे एक प्रमुख पद असते. त्यामुळे कोणाचाही अपमान होणार नाही, याची बोलताना काळजी त्यांनी घेतली पाहिजे. मराठी माणसामुळेच मुंबईला वैभव आहे. मराठी माणसांचे योगदान कोणालाही नाकारता येणार नाही. इतर राज्यातील, समाजातील लोक व्यवसायच करतात. मात्र मुंबईचे श्रेय कोणालाही घेता येणार नाही, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

संयुक्त महराष्ट्राच्या लढ्यात रक्त सांडून मुंबई हक्काने मिळवली आहे. १०५ हुतात्मे त्यासाठी झाले आहेत. बाळासाहेब ठाकरेंचेही मुंबईसाठी मोठे योगदान आहे. बाळासाहेब मराठी माणसांसाठी लढत होते. बाळासाहेब नेहमी मुंबईच्या पाठीशी राहिले, असेही एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले. एकनाथ शिंदे सध्या मालेगाव दौऱ्यावर आहेत. त्यावेळी पत्रकार परिषद घेत त्यांनी आपली भूमिका मांडली.