अर्जुन खोतकर अखेर शिंदे गटात

जालना,३० जुलै /प्रतिनिधी :-परिस्थितीमुळे काही निर्णय घ्यावे लागतात. त्यामुळे मी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देत आहे, असे म्हणत शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी अखेर शिंदे गटात सहभागी होत असल्याचे जाहीर केले. यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले होते.

गेले काही दिवस दिल्लीत असलेले खोतकर शुक्रवारी जालन्यात परतले. त्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, कुटुंबीय, कार्यकर्त्यांशी चर्चा करून आज पत्रकार परिषद घेत आपल्या मनातील खदखद बाहेर काढली. ते म्हणाले की, पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या अनुमतीनंतरच आपण हा निर्णय घेत आहोत. अडचणीत आहात तर निर्णय घेऊ शकता, असे ठाकरे म्हणाल्याचे खोतकरांनी सांगितले.

शेतकऱ्यांसाठी कारखाना सुरू करण्याचे एकनाथ शिदेंचे आश्वासन

खोतकर म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून मी दिल्लीत अनेक विषयांवर चर्चा केली. त्यानंतर आज जालन्यात येऊन निर्णय घोषित करतोय. मी सच्चा शिवसैनिक आहे. घरी आले की परिवार दिसतो. त्यामुळे काही निर्णय करणे गरजेचे आहेत. मी पक्षप्रमुखांकडे परवानगी मागितली आणि यासंदर्भात ते बोलले. जालन्यातील साखर कारखान्याविरोधात ईडीची जी कारवाई सुरू आहे, ती अडचण दूर होईल की नाही माहिती नाही. मात्र शेतकऱ्यांसाठी, हा कारखाना सुरू करण्यासाठी मदत करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. त्यामुळे मी आज सर्वांच्या साक्षीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थन करण्याचा निर्णय घेतला आहे आणि तसे जाहीर करत आहे. दरम्यान माझा शिवसेना उपनेते पदाचा राजीनामा देखील पक्षश्रेष्ठीकडे दिला आहे.

खोतकर पुढे म्हणाले की, १९९० मध्ये शिवसेनेकडून मी पहिल्यांदा आमदार झालो. आजपर्यंत प्रामाणिकपणे पक्षाची सेवा करत आलो. मी एकटाच नाही तर सर्व सहकाऱ्यांनी मिळून जिल्ह्यात शिवसेनेचे संघटन वाढवले. सामान्य माणसापर्यंत आम्ही गेलो. सामान्यांनीही तेवढाच विश्वास आमच्यावर टाकला. अनेक संस्था, विधानसभा, लोकसभा निवडणुकीत आमच्या पदरात लोकांनी यश टाकलं त्याबद्दल जालना जिल्ह्यातल्या मतदारांचे आभार व्यक्त करतो. पक्ष नेतृत्वाचेही आभार व्यक्त करतो. ती जबाबदारी मी समर्थपणे सांभाळू शकलो.

लोकसभा निवडणुकीत समर्थन देण्याची दानवेंची मागणी

रावसाहेब दानवे यांनी मला चहा प्यायला बोलावले. तीन वर्षांनंतर आम्ही बोललो. अडीच वर्षांनंतर त्यांनी फोन केला. त्यांनी मला चहा घेण्यासाठी बोलावले. जर एखादा दुश्मन जरी असला तरी चहा घेण्यासाठी बोलावले तर जायचं कसं नाही. म्हणून मी चहा घेण्यासाठी दानवेंच्या घरी गेलो. मग बोलता बोलता लोकसभा निवडणुकीचा विषय निघाला. मला लोकसभा निवडणुकीला समर्थन द्या, तुम्ही मला पाठिंबा दिला पाहिजे. ही जागा भाजपची आहे, ती तुम्हाला सुटणार नाही. तुम्ही स्थानिक नेते आहात, असे दानवेंनी सांगितले. एवढंच आमचं बोलणं झालं. पण मी लोकसभा निवडणुकीसाठी आग्रही असल्याचे ठामपणे सांगितले, असेही खोतकरांनी स्पष्ट केले. याव्यतिरिक्त इतर कोणतीही राजकीय डील झालेली नाही.