ओबीसी आरक्षणामुळे प्रमुख नेत्यांचे वॉर्ड आरक्षित

मुंबई ,२९जुलै /प्रतिनिधी :- सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला मान्यता दिल्यानंतर मुंबई महानगरपालिकेकडून आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. यामध्ये शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेप्रमाणेच अन्य पक्षातील नेत्यांनाही ओबीसी आरक्षणाचा फटका बसला आहे. शिवसेनेचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर, काँग्रेसचे माजी विरोधी पक्ष नेते रवी राजा, राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी गट नेत्या राखी जाधव, माजी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, काँगेसचे जावेद जुनेजा, शिवसेनेच्या माजी सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव यांचे वॉर्ड ओबीसी उमेदवारांसाठी आरक्षित झाले आहेत. त्यामुळे आता या नेत्यांना निवडणूक लढवण्यासाठी दुसऱ्या वॉर्डात जावे लागणार आहे.

ओबीसींच्या आरक्षणाला मान्यता मिळाल्यानंतर मुंबई महानगरपालिकेकडून एससी, एसटी प्रवर्गाचे यापूर्वी घोषित झालेले आरक्षण वगळता २३६ पैकी २१९ वॉर्डांची आरक्षण लॉटरी काढण्यात आली. २१९ पैकी ६३ वॉर्ड हे ओबीसी आरक्षित झाले आहेत. ६३ पैकी ५३ वॉर्डमध्ये गेल्या तीन निवडणुकांमधे एकदाही ओबीसी आरक्षण आलेले नसल्याने नियमानुसार ५३ वॉर्ड ओबीसी आरक्षितच होतील.

ओबीसी आरक्षित

ओबीसींसाठी आरक्षित असणाऱ्या वॉर्डमध्ये वॉर्ड क्रमांक 3, 7, 9, 12, 13, 27, 30, 38, 40, 42, 48, 51, 53, 62, 76, 79, 81, 87, 89, 101, 110, 117, 128, 129, 132, 135, 137, 146, 147, 148, 150, 152, 154, 155, 159, 161, 164, 174, 179, 180, 183, 185, 188, 195, 200, 202, 203, 217, 218, 222, 223, 230, 236 यांचा समावेश असणार आहे. या वॉर्डांमध्ये मागील तीन निवडणुकांत ओबीसी आरक्षण नव्हतं. यावेळी ओबीसी आरक्षणासाठी अन्य 10 वॉर्डसाठीदेखील लॉटरी काढण्यात आली. यात 17, 82, 96, 73, 16, 127, 98, 61, 173, 130 या वॉर्डचा समावेश असणार आहे.

दरम्यान, भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांचा प्रभाग 109 सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित करण्यात आला आहे. त्यामुळे प्रभाकर शिंदेना बाजूच्या वॉर्डमधून निवडणूक लढवावी लागणार आहे. शिवसेनेचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचा वॉर्ड क्र. 96 ओबीसी महिला आरक्षित जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांनादेखील हा धक्का मानला जात आहे. परंतु विश्वनाथ महाडेश्वर यांच्या पत्नी, माजी नगरसेविका पूजा महाडेश्वर यांना या वॉर्डमधून उमेदवारी मिळू शकेल अशी चर्चा आहे.