भारतात क्रीडा क्षेत्रासाठी वर्तमानकाळाइतका उत्तम काळ यापूर्वी कधीच नव्हता-पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधानांनी 44 व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडचा प्रारंभ झाल्याची केली घोषणा

“बुद्धिबळाची सर्वात प्रतिष्ठित स्पर्धा भारतात, बुद्धिबळाच्या मायदेशात आली आहे”

“44वी बुद्धिबळ ऑलिम्पियाड ही स्पर्धा प्रथमच घडणाऱ्या अनेक गोष्टींची आणि अनेक विक्रमांची साक्षीदार असेल”

“तामिळनाडू हे देशाकरिता बुद्धिबळाचे उर्जाकेंद्र आहे”

चेन्नई ,२८ जुलै /प्रतिनिधी :- पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांनी चेन्नई येथील जेएलएन इनडोअर स्टेडीयम मध्ये आज  44 व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडची सुरुवात झाल्याची घोषणा केली. तामिळनाडूचे राज्यपाल आर.एन.रवी, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के.स्टॅलिन, केंद्रीय मंत्री अनुराग सिंह ठाकूर आणि एल. मुरुगन यांच्यासह एफआयडीई अर्थात आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाचे अध्यक्ष अर्केडी वोर्कोव्हीच हे देखील यावेळी उपस्थित होते.

Image

यावेळी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी जगभरातून भारतात आलेल्या खेळाडूंचे आणि बुद्धिबळ प्रेमींचे स्वागत केले. ही स्पर्धा ‘स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा’दरम्यान होत असल्यामुळे या स्पर्धेच्या आयोजनाच्या काळाच्या महत्त्वाकडे त्यांनी सर्वांचे लक्ष वेधले. ते पुढे म्हणाले की बुद्धिबळाची सर्वात प्रतिष्ठित स्पर्धा भारतात, बुद्धिबळाच्या मायदेशात आली आहे.

44वी बुद्धिबळ ऑलिम्पियाड ही स्पर्धा प्रथमच घडणाऱ्या अनेक गोष्टींची आणि अनेक विक्रमांची साक्षीदार असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. बुद्धिबळ खेळाचा उगम जेथे झाला त्या भारत देशात पहिल्यांदाच बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेचे आयोजन होते आहे. गेल्या 3 दशकानंतर ही स्पर्धा आशिया खंडात भरविली गेली आहे. आतापर्यंतच्या सर्वात जास्त संख्येने देश या स्पर्धेत सहभागी होत आहेत. तसेच सर्वात जास्त संघ या स्पर्धेत खेळणार आहेत.महिला गटात सर्वाधिक संख्येने प्रवेशिका आल्या आहेत. ते म्हणाले की या वेळी प्रथमच बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेच्या मशाल रिलेची सुरुवात करण्यात आली आहे.

बुध्दिबळाशी तामिळनाडूचा फार दृढ ऐतिहासिक संबंध असल्याचे  पंतप्रधानांनी अधोरेखित केले. म्हणूनच तामिळनाडू हे देशाकरिता बुद्धिबळाचे उर्जाकेंद्र आहे. या राज्याने भारताचे अनेक ग्रँड मास्टर्स निर्माण केले आहेत. ही बुद्धीवंतांची, चैतन्यमयी संस्कृतीची आणि तमिळ या जगातील सर्वात प्राचीन भाषेची भूमी आहे असे पंतप्रधान मोदी यांनी यावेळी सांगितले.

Image

पंतप्रधान म्हणाले की, खेळ हे अत्यंत सुंदर असतात कारण त्यांच्यामध्ये सर्वांना एकत्र आणण्याची उपजत शक्ती असते.खेळ लोकांना आणि समाजांना एकमेकांजवळ आणतात. खेळांमुळे संघभावना जोपासली जाते. भारतात क्रीडा क्षेत्रासाठी सध्या आहे तितका उत्तम काळ यापूर्वी कधीच नव्हता याकडे त्यांनी सर्वांचे लक्ष वेधले. “भारताने ऑलिम्पिक, पॅरालिम्पिक तसेच डेफलिम्पिक स्पर्धांमध्ये आतापर्यंतची सर्वात उत्कृष्ट कामगिरी केली आहे. आपण या स्पर्धांमध्ये ज्या प्रकारात कधीच जिंकलो नव्हतो त्यामध्ये आपण झळाळते यश प्राप्त करून दाखवले,” ते म्हणाले. देशातील युवावर्गाची उर्जा आणि त्यांना सक्षम करणारे वातावरण या दोन महत्त्वाच्या घटकांच्या योग्य मिलाफामुळे भारतातील क्रीडा संस्कृती आता अधिकाधिक बहरत  आहे असे ते पुढे म्हणाले.

खेळामध्ये कधी कोणी पराभूत नसतात. खेळात विजेते आणि भावी विजेते असतात अशी टिप्पणी त्यांनी केली. 44व्या ऑलिम्पियाड मध्ये यशस्वी होण्यासाठी त्यांनी सर्व सहभागी खेळाडू तसेच संघांना शुभेच्छा दिल्या.

भारताला क्रीडाक्षेत्रात जागतिक तोडीचा देश बनविण्याची प्रेरणा मिळते : केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर

यावेळी उपस्थितांना संबोधित करताना केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की ज्या भूमीत बुद्धिबळाचा खेळ उगम पावला तीच ही भारतभूमी आहे आणि इतिहासात प्रथमच भारत या प्रतिष्ठित स्पर्धेचे यजमानपद भूषवित आहे हा आपल्यासाठी अत्यंत अभिमानाचा क्षण आहे. केंद्रीय मंत्री म्हणाले की 40 दिवसांपूर्वी बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेची सर्वात पहिली मशाल रिले पंतप्रधानांकडे सुपूर्द करण्यात आली आणि त्यांनी ती मशाल आपल्या देशाचा जगप्रसिध्द बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद यांच्याकडे सोपविली. आपल्या देशाच्या स्वातंत्र्यप्राप्तीला 75 वर्षे होत असल्याबद्दल साजऱ्या होणाऱ्या अमृतमहोत्सवानिमित्त मशाल रिलेने देशातील विशेष महत्त्वाच्या 75 स्थळांना भेट दिली असे ठाकूर यांनी सांगितले.

केंद्रीय मंत्री ठाकूर म्हणाले की पंतप्रधानांनी नेहमीच क्रीडाक्षेत्र आणि क्रीडापटूंना भक्कम पाठींबा दिला आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पाठींबा आणि ध्यास यांतून आम्हा सर्वांना क्रीडाक्षेत्राला अधिक सुधारणा करण्यासाठी काम करण्याची आणि भारताला क्रीडाक्षेत्रात जागतिक तोडीचा देश बनविण्याची प्रेरणा मिळते असे त्यांनी सांगितले. सध्या देशात 2700 कोटी रुपये खर्चाच्या क्रीडाविषयक पायाभूत सुविधा उभारणीच्या 300 पेक्षा जास्त प्रकल्पांचे काम सुरु आहे अशी माहिती त्यांनी दिली. खेलो इंडिया योजना देशातील युवा क्रीडापटूंची जोपासना करण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरली आहे याचा त्यांनी ठळक उल्लेख केला.  

Image

पार्श्वभूमी :

पंतप्रधानांनी 19 जून 2022 रोजी नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी राष्ट्रीय स्टेडीयम येथे पहिल्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धा मशाल रिलेची देखील सुरुवात केली होती. या मशालीने 40 दिवसांहून अधिक कालावधीत देशभरातील 75 विशेष महत्त्वाच्या ठिकाणांना भेट देत, सुमारे 20,000 किलोमीटर्सची वाटचाल केली आणि या मशालीचा हा प्रवास महाबलीपुरम येथे समाप्त झाला. त्यानंतर या मशालीने स्वित्झर्लंडच्या एफआयडीई मुख्यालयाकडे कूच केले. 

चेन्नई येथे 28 जुलै ते 9 ऑगस्ट या कालावधीत 44 व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडचे आयोजन करण्यात आले आहे. वर्ष 1927 पासून आयोजित होत असलेल्या या प्रतिष्ठित स्पर्धेच्या यजमानपदाचा मान भारताला यावर्षी पहिल्यांदाच आणि आशियाला 30 वर्षानंतर मिळाला आहे. आतापर्यंतच्या सर्वाधिक संख्येने म्हणजे 187 देश या वर्षीच्या स्पर्धेमध्ये भाग घेत आहेत. भारत देखील आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या क्रीडापथकासह म्हणजे 6 संघांमध्ये विभागलेल्या एकूण 30 खेळाडूंसह या स्पर्धेत सहभागी होत आहे.