वैजापूर तालुक्यातील जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांचे आरक्षण ; दिग्गजांचा हिरमोड

वैजापूर,२८ जुलै /प्रतिनिधी :- जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी राखीव जागांचे आरक्षण गुरुवारी पंचायत समितीच्या सभागृहात काढण्यात आले.

आरक्षण सोडतीच्या कार्यक्रमाला उपविभागिय अधिकारी माणिक आहेर, तहसिलदार राहुल गायकवाड, प्रभारी गटविकास अधिकारी हनुमंत बोयनर, नायब तहसिलदार महेंद्र गिरगे, पोलिस निरीक्षक सम्राटसिंह राजपूत यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी जिल्हा परिषदेचे गट आठ वरुन नऊ झाले असुन पुर्वीच्या आठ गटातील बोरसर, घायगाव व वांजरगाव हे तीन गट वळुन त्यांच्या जागी चोरवाघलगाव, लाडगाव व धोंदलगाव हे तीन गट नव्याने निर्माण करुन त्यात खंडाळा हा गट नव्याने समाविष्ट केला आहे.‌ त्याचप्रमाणे पंचायत समिती गणांची संख्या सोळावरून अठरा झाली आहे.

2022 मध्ये होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी सोडत  पद्धतीने अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांच्या मागास प्रवर्ग या राखीव जागांसाठी आरक्षण काढण्यात आले. यामध्ये 2002 ते 2017 या कालावधीत नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी असणाऱ्या आरक्षणाच्या आधारे आरक्षण देण्यात आले.‌ सर्वोच्च न्यायालयाच्या आधारे वैजापूर तालुक्याला नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी 21 टक्के जागा मिळाल्या होत्या. त्यानुसार,नागरिकांचा मागास प्रवर्ग म्हणजे ओबीसी वर्गासाठी यावेळी चार जागा आरक्षित करण्यात आल्या असुन यात दोन जागा महिलांना सुटल्या आहेत. बिलोणी व पालखेड या दोन गणांच्या जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी आरक्षित झाल्या असुन शिऊर व घायगाव या गणांच्या जागा नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आहेत. अठरा गणांपैकी नऊ गण महिलांसाठी आरक्षित असुन यात पोखरी (अनुसुचित जाती महिला), नागमठाण (अनुसुचित जमाती महिला), वाकला, धोंदलगाव, पारळा, खंडाळा व चोरवाघलगाव (सर्वसाधारण महिला), शिऊर, घायगाव (नामाप्र, महिला) या गणांचा समावेश आहे. बाभुळगाव, सवंदगाव, लासुरगाव, बोरसर, लाडगाव व महालगाव या सहा जागा सर्वसाधारण उमेदवारांसाठी आहेत. वांजरगावची जागा अनचसुचित जातीसाठी राखीव झाली आहे. सोडतीच्या सुरुवातीला अनुसुचित जातीचे व जमाती प्रवर्गाचे 2011 च्या लोकसंख्येनुसार सोडत पद्धतीने आरक्षण काढण्यात आले.

जिल्हा परिषद सदस्यांच्या आकांक्षावर पाणी

जिल्हा परिषद आरक्षणात पंकज ठोंबरे यांचा पुर्वीचा वांजरगाव (सर्वसाधारण) व आताचा धोंदलगाव हा गट ओबीसीसाठी राखीव झाला आहे. त्याचप्रमाणे दिपक सिंह राजपूत यांचा सवंदगाव गट अनुसुचित जमाती महिलांसाठी राखीव झाला आहे. शिऊर गट ओबीसी महिलांसाठी तर महालगाव,वाघलगाव व लाडगाव हे गटही महिलांसाठी आरक्षित झाले आहेत. त्यामुळे महालगाव गटातील सध्याचे शिक्षण सभापती अविनाश गलांडे यांच्यासह अनेक इच्छुकांची निराशा झाली आहे.