संसद परिसरात २४ निलंबित खासदारांचे धरणे

नवी दिल्ली : लोकसभा आणि राज्यसभेत चर्चेची मागणी करत निलंबित करण्यात आलेले २४ खासदार बुधवारी रात्री संसद भवन संकुलातील गांधी पुतळ्यासमोर धरणे धरून बसले. या खासदारांसाठी खाण्यापिण्यासह आवश्यक सुविधांची व्यवस्था विरोधी पक्षांकडून करण्यात आली होती.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी धरणे धरणाऱ्या खासदारांच्या नाश्त्याची जबाबदारी डीएमकेने घेतली आहे. तृणमूल काँग्रेसतर्फे लंच आणि आम आदमी पार्टीतर्फे डिनरचे आयोजन करण्यात येणार आहे. बुधवारी द्रमुकचे खासदार तिरुची शिव यांनी धरणे देत असलेल्या खासदारांना नाश्त्यात डोसा दिला. फूड रोस्टर दही-भातापासून हलव्यापर्यंत आहे. या डिनरचे आयोजन तृणमूल काँग्रेसने केले होते.

खासदारांचे हे धरणे बुधवारी सकाळी ११ वाजता सुरू झाले असून ते शुक्रवारी दुपारी १ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. या आंदोलनात काही महिला आणि वयोवृद्ध खासदार शिफ्टमध्ये सहभागी होत आहेत. खासदारांची ही निदर्शने ५० तासांचे आहे.

निलंबित खासदारांच्या हातात ‘मोदी-शहा हुकूमशहा’ असे फलक आहे. सरकार चर्चेपासून पळ काढत असल्याचा आरोप खासदारांनी केला आहे. त्यामुळेच खासदारांना निलंबित करण्यात आले आहे. गुजरातमध्ये विषारी दारूमुळे झालेल्या मृत्यूचा मुद्दा मी राज्यसभेत मांडत होतो, मात्र मला निलंबित करण्यात आले, असे आपचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी सांगितले.

मंगळवारी १९ विरोधी खासदारांना राज्यसभेतून निलंबित करण्यात आले. त्यापैकी ७ खासदार फक्त तृणमूल काँग्रेसचे होते. बुधवारी आपचे खासदार संजय सिंह यांना निलंबित करण्यात आले आहे. चर्चेची मागणी करत उपसभापतींवर पेपर फेकल्याचा आरोप सर्वांवर आहे.