मोदी तुमचे वडील होते का? पंतप्रधान मोदींचे फोटो पोस्टरवर लावून मतं का मागितली?-मुनगंटीवारांचा ठाकरेंवर पलटवार

मुंबई : निवडणुकीच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदींचे फोटो पोस्टरवर लावून मते मागितली, तेव्हा मोदी तुमचे वडील होते का? अशी खोचक टीका भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर केली आहे.

उद्धव ठाकरेंनी सामनाला दिलेल्या मुलाखतीत शिवसेनेच्या बंडखोर ४० आमदार आणि १२ खासदारांनी माझ्या वडिलांच्या नावे मते का मागता तुमच्या नावाने मते मागा, असे पुन्हा एकदा मुनगंटीवार यांनी सुनावले आहे. यावरून शिंदे गटासह भाजपकडून शिवसेना आणि उद्धव ठाकरेंवर निशाणा साधण्यात आला आहे.

शरद पवारांनी शिवसेना संपविण्याचा प्रयत्न केला, असा आरोप कोल्हापूरच्या सभेत ३५ वर्षांपूर्वी शिवसेनेच्या नेत्यांनी केला होता. विरोधी पक्ष हा संवेदनशील आणि सुसंस्कृत असावा असे म्हणता. इतरांना गद्दार बोलता. मुलाखतीत म्हणता माझ्या वडिलांचे फोटो लावून मत मागितले. मग २०१९ मध्ये निवडणुकीत बॅनरवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचेही फोटो होते. मोदी तुमचे वडील नव्हते. मग तुम्ही फोटो का लावता? सूडाचे राजकारण नको म्हणता मग देवेंद्र फडणवीसांना नोटीस, राणेंना अजामीनपात्र गुन्हा दाखल केला. खासदार नवनीत राणा यांना जेलमध्ये टाकले? तुम्ही सांगता सुडाचे राजकारण नको, मग देवेंद्र फडणवीस, नारायण राणे, नितेश राणेंसह नवनीत राणा यांना त्रास कुणी दिला? अशा शब्दात भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर टीकास्त्र सोडले आहे.