हेल्थ केअर आणि फ्रंट लाईन वर्कर्सनी प्रिकॉशन डोस घेऊन समाजापुढे आदर्श निर्माण करावा -जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

औरंगाबाद,२७ जुलै /प्रतिनिधी :- औरंगाबाद जिल्ह्यातील हेल्थ केअर वर्कर व फ्रंट लाईन वर्कर यांनी प्रथम पात्रतेनंतर प्रिकॉशन डोस (Precaution Dose) घेवून सर्व समाजापुढे लसीकरणाबाबत उदाहरण घालून द्यावे. “आधी केले आणि मग सांगितले” या उक्तीप्रमाणे सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी काम केल्यास लवकरच कोविड मुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरू होईल. “कोविड लसीकरणाचा अमृत महोत्सव” 30 सप्टेंबर 2022 पर्यंत साजरा करण्यात येत आहे.  या दरम्यान 75 दिवसामध्ये Precaution Dose सोबतच ज्या नागरीकांचे कोविड-19 लसीकरणाचे इतर डोस राहिले असतील त्यांनाही डोस घेण्यासाठी हेल्थ केअर वर्कर व फ्रंट लाईन वर्कर यांनी प्रोत्साहित करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले.

            जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा टास्क फोर्सची बैठक सोमवार (दि 25) रोजी पार पडली . यावेळी प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटणे, डॉ. पारस मंडलेचा, डॉ. दयानंद मोतीपवळे तसेच विविध विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

            बैठकीच्या सुरूवातीला औरंगाबाद जिल्ह्यातील कोविड लसीकरणाच्या कामाच्या सद्यस्थितीचा आढावा जिल्हाधिकारी यांनी घेतला.  सद्य:सिथतीत एकूण उद्दिष्टापैकी (3576768) पहिला डोस 3031959 (84.77 टक्के) व दुसरा डोस 2345066 (66.56 टक्के) एवढे काम झालेले आहे. भारत सरकार व महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनेप्रमाणे  18 जुलै 2022 रोजी झालेल्या जिल्हा टास्क फोर्स बैठकीतील निर्णयानूसार कोविड लसीकरणाचा दुसरा डोस घेतलेल्या नागरीकाना 6 महिने किंवा 26 आठवडे झाल्यानंतर Precaution Dose देण्याबाबत सुक्ष्म नियोजन करावे. सर्व यंत्रणांनी आपल्यास्तरावर सदरील लाथार्थ्यांच्या लसीकरणाचे सुक्ष्म नियोजन करुन ठरवून दिलेल्या कालमर्यादेत लसीकरण पूर्ण होईल यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या.