स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या ललित कला संकुल संचालकपदी डॉ. पृथ्वीराज तौर यांची नियुक्ती

नांदेड ,२५ जुलै /प्रतिनिधी :-स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील ललित व प्रयोगजिवी कला संकुलाच्या संचालकपदी सुप्रसिद्ध लेखक आणि मराठी भाषेचे प्राध्यापक डॉ. पृथ्वीराज तौर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी केलेल्या नियुक्तीचा स्विकार करत डॉ. पृथ्वीराज तौर यांनी  सोमवार दि. २५ रोजी दुपारी पदभार स्वीकारला.  

ललित व प्रयोगजिवी कला संकुल हे ‘स्वारातीम’ विद्यापीठातील वैशिष्ट्यपूर्ण संकुल असून नाटक, संगित, नृत्य व दृश्यकलेचे पदवी व पदव्युत्तर शिक्षण इथे दिले जाते. विद्यापीठाचा सांस्कृतिक चेहरा अशी या संकुलाची ओळख आहे.  

डॉ. पृथ्वीराज तौर हे विद्यापीठातील भाषा संकुलात मराठीचे प्राध्यापक असून कवी, समीक्षक आणि भाषांतरकार म्हणून त्यांची सर्वदूर ओळख आहे. डॉ. तौर यांची एकूण चोवीस पुस्तके प्रकाशित आहेत. ‘नाट्यवैभव’ आणि ‘मराठी नाट्यात्म साहित्य’ या ग्रंथाचे संपादन त्यांनी केले आहे. पुण्याच्या प्रतिष्ठीत एफटीआयआय संस्थेतून फिल्म अप्रेसिएशन कोर्स डॉ. तौर यांनी केलेला आहे. भाषा संकुल आणि विद्यार्थी विकास विभागाचे संचालकपद डॉ. तौर यांनी यापूर्वी सांभाळले आहे. ते विद्यापीठाचे सिनेट व विद्वत परिषद सदस्यही होते. 

डॉ. पी. विठ्ठल यांच्याकडून आज डॉ. पृथ्वीराज तौर यांनी पदभार स्वीकारला. यावेळी  व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. घनश्याम येळणे, माध्यमशास्त्र संकुलाचे संचालक डॉ. दिपक शिंदे, भाषा संकुलाच्या संचालीक डॉ. शैलजा वाडीकर, शिक्षणशास्त्र संकुलाचे संचालक डॉ. सिंकुकुमार सिंह, अधिसभा सदस्य डॉ. चंद्रकांत बाविस्कर, डॉ. रमेश ढगे, डॉ. महेश जोशी, डॉ. सचिन नरंगले, डॉ कैलास यादव, डॉ. वैजनाथ अनमुलवाड व संकुलातील प्राध्यापक उपस्थित होते.‌ 

मराठवाड्यातील सांस्कृतिक चळवळीला ललित व प्रयोगजिवी कला संकुलाच्या वतीने हातभार लावून विद्यार्थ्यांना पुण्या-मुंबईतील व्यावसायिक नाट्य चित्रपट क्षेत्रात संधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे डॉ. पृथ्वीराज तौर यांनी पदभार स्वीकारल्यानंतर सांगितले.  

डॉ. पृथ्वीराज तौर यांच्या नियुक्तीचे स्वागत करुन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले, प्र‌‌‌-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, कुलसचिव डॉ. सर्जेराव शिंदे, आंतरविद्या शाखेच्या अधिष्ठाता डॉ. वैजयंता पाटील, डॉ. दिपक बच्चेवार, डॉ. राजाराम माने, जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम, डॉ. सूर्यप्रकाश जाधव, डॉ. पराग भालचंद्र, डॉ. डी. डी. पवार यांनी त्यांचे अभिनंदन केले.