नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत पटकावले रौप्य पदक

ओरेगॉन : भारताचा गोल्ड मेडलिस्ट नीरज चोप्राने जागतिक अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत ऐतिहासिक रौप्यपदक जिंकले. २००३ साली अंजू बॉबी जॉर्ज यांच्यानंतर भारताला जागतिक स्पर्धेत पदक जिंकून देणारा तो पहिलाच खेळाडू ठरला. या स्पर्धेत भालाफेकमध्ये ग्रेनेडाच्या अँडरसन पेटर्सनने सुवर्ण पदक पटकावले. त्याने ९०.५४ मीटर भाला फेकला. चेक रिपब्लिकच्या जेकब वाड्लेचने ८८.०९ मीटर भालाफेक करत कांस्य पदक पटकावले.

नीरज चोप्राने 88.13 मीटर भालाफेक करत रौप्य पदकाला गवसणी घातली. तब्बल १९ वर्षानंतर भारताने जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत पदक मिळवले आहे. यापूर्वी लांब उडीज अंजू बॉबी जॉर्जने पदक जिंकले होते. याचबरोबर नीरज जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत पदक जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू देखील ठरला आहे.

नीरज चोप्राने जागतिक अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेच्या भालाफेकीच्या अंतिम फेरीची सुरूवात केली. मात्र त्याने पहिल्याच प्रयत्नात फाऊल केला. दुसरीकडे सुवर्ण पदकाचा प्रबळ दावेदार आणि गतविजेता अँडरसन पेटर्सने आपल्या पहिल्याच प्रयत्नात ९०.२१ मीटर भालाफेक करत नीरज चोप्रासमोर मोठे आव्हान ठेवले. त्यानंतर नीरजने ८२.३९ मीटर भाला फेकला. तो यादीत चौथ्या स्थानावर पोहचला.

मात्र ग्रेनेडाच्या अँडरसन पेटर्सने आपल्या दुसऱ्या प्रयत्नात ९०.४६ मीटर भाला फेकून सुवर्ण पदकासाठी नीरज समोर अजून मोठे आव्हान ठेवले. पाचव्या स्थानावर घसरलेल्या नीरज चोप्राने आपल्या तिसऱ्या प्रयत्नात ८६.३७ मीटर भाला फेकून आपली कामगिरी सुधारली. तिसऱ्या प्रयत्नानंतर तो पुन्हा चौथ्या क्रमांकावर आला.