कवयित्री शांता शेळके जन्मशताब्दीनिमित्त आयोजित “हे शब्द रेशमाचे” या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे उत्साहात सादरीकरण

मुंबई ,२४ जुलै /प्रतिनिधी :- मराठी साहित्य विश्वातील एक अलौकिक साहित्य प्रतिभा लाभलेल्या कवियित्री शांता शेळके यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने “हे शब्द रेशमाचे” या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे दि. २३ जुलै, २०२२ रोजी मास्टर दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह, विलेपार्ले या ठिकाणी आयोजन करण्यात आले होते. प्रेक्षकांच्या उस्फूर्त प्रतिसादात पार पडलेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन विलेपार्ले मतदार संघाचे आमदार श्री पराग अळवणी यांच्या हस्ते झाले. यावेळी श्रीधर फडके, पुष्कर श्रोत्री, मधुरा वेलणकर तसेच सांस्कृतिक कार्य विभागाच्या उपसचिव, विद्या वाघमारे व सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे सह संचालक श्री. पांडे श्रीराम यांची उपस्थिती होती.

मराठी साहित्य विश्वात शांता शेळके यांनी लेखिका, कवयित्री, अनुवादक, समीक्षा-स्तंभ लेखिका, वृत्तपत्र सहसंपादिका इत्यादी माध्यमातून मराठी साहित्यात मोलाची भर घातली आहे. शांता शेळके यांच्या विपुल व बहुआयामी साहित्यनिर्मितीचा मागोवा घेत त्यांच्या अलौकिक कार्याच्या स्मरणार्थ विशेष सांस्कृतिक कार्यक्रम, सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडून सादर करण्यात आला . शांता शेळके यांच्या काही कविता व उतारा अभिवाचन अभिनेते पुष्कर श्रोत्री व अभिनेत्री मधुरा वेलणकर यांनी केले. शांताबाईंनी लिहलेल्या गीतांची सुरेल प्रस्तृती या स्वरसोहळयातून, श्रीधर फडके, प्राजक्ता रानडे, जय आजगांवकर, अर्चना गोरे, नचिकेत देसाई, सावनी रवींद्र, बालकलाकार काव्या खेडेकर व शराण्या साखरदांडे यांनी केली. प्रशांत लळीत यांचे संगीत संयोजन तसेच वैशाली पोतदार यांच्या कथक नृत्याने प्रत्येकांची मने जिंकली. विनीत गोरे यांनी या कार्यक्रमासाठी संयोजन केले. या कार्यक्रमास भरभरून प्रेक्षकांनी प्रतिसाद दिला.