एमजीएम संस्कार विद्यालयात ईगल लूनार प्रतिकृती तयार करणे कार्यशाळा उत्साहात

औरंगाबाद,२३ जुलै /प्रतिनिधी :- महात्मा गांधी मिशन संचलित एपीजे अब्दुल कलाम खगोल विज्ञान केंद्र व एमजीएम संस्कार विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने मानवाला 20 जुलै रोजी चंद्रावर पहिले पाऊल ठेवून 53 वर्ष पूर्ण झाल्या निमित्त आयोजित केलेल्या ईगल लूनार प्रतिकृती कार्यशाळेत विद्यालयातील 125 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.

या कार्यशाळेसाठी विद्यालयाच्या संचालिका डॉ. अपर्णा कक्कड यांनी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी विद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती उषा जाधव,मुख्याध्यापिका स्मिता कुलकर्णी,पर्यवेक्षक विशाल भुसारे उपस्थित होते. कार्यशाळेमध्ये विद्यार्थ्यांनी ईगल लूनार या मानवाने चंद्रावर  पाठवलेल्या पहिल्या चांद्रयानाची प्रतिकृती तयार केली.

या कार्यशाळे संदर्भात  विद्यार्थ्यांना खगोल विज्ञान केंद्राचे प्रमुख श्रीनिवास औंधकर यांनी मार्गदर्शन केले. तसेच या कार्यशाळेमध्ये यानाची प्रतिकृती तयार करण्यासाठी शाळेचे भूगोल अध्यापक विवेक पाटील यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.  या कार्यशाळेमध्ये खगोल विज्ञान केंद्रातील योगेश साळी , अशोक क्षीरसागर , मयुरी वैद्य,मयुरी पाटील  व संस्कार विद्यालयातील संदीप कदम यांनी कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी मोलाचे सहकार्य केले