गद्दारांना गद्दार म्हणणारच:हिम्मत असेल तर राजीनामे द्या – आदित्य ठाकरे

वैजापुरच्या सभेत आदित्य ठाकरेंचा घणाघात

May be an image of 7 people and people standing

वैजापूर,२२ जुलै /प्रतिनिधी :- “त्यांना निवडणुकीत तिकीटे दिली, आमदारकी, मंत्रिपदे दिली. भरभरून प्रेम दिले. मात्र प्रेमाने मिठी मारल्यानंतर त्यांनी पाठीत खंजीर खुपसला.यात आमचे काय चुकलं ? असा सवाल करून पाठीत खंजीर खुपसणाऱ्या या गद्दारांना गद्दार म्हणणारच असे युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी वैजापुर येथे आयोजित जाहीर सभेत सांगितले. “हिम्मत असेल तर राजीनामा द्या व पुन्हा जनतेसमोर या, जनतेचा न्यायनिवाडा आम्हाला मान्य असेल असे विधानही त्यांनी केले. 

May be an image of 4 people, beard and people standing

राज्यातील आघाडी सरकार कोसळल्यानंतर शिंदे गटात सामील झालेल्या आमदारांच्या मतदारसंघात जाऊन शिवसैनिकांशी संवाद साधण्यासाठी आयोजित संवाद यात्रेसाठी ते वैजापुरात आले होते. त्यांच्यासोबत शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, आमदार अंबादास दानवे, आमदार उदयसिंह राजपूत, जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती अविनाश पाटील गलांडे, माजी जिल्हा परिषद सदस्य मनाजी मिसाळ, संजय पाटील निकम, शिवसेनेचे तालुकाप्रमुख सचिन वाणी यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

May be an image of one or more people and people standing

यावेळी बोलताना आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटात सामील झालेल्या चाळीस आमदारांवर टिकेची झोड उठवली. त्यांना पक्षाच्या माध्यमातुन ख्याती मिळवुन दिली. आमदारकी, मंत्रीपदे दिली. मग यात आमचे काय चुकले? भरभरुन प्रेम करणे, विश्वास ठेवणे हीच अन्यायाची परिभाषा असेल तर हा अन्याय आम्ही केला आहे. पण थोडी जरी शरम असेल तर या आमदारांनी राजीनामा देऊन पुन्हा निवडणुक लढवावी असे आवाहन त्यांनी केले. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पद स्वीकारल्यानंतर रायगडाच्या विकासासाठी सहाशे कोटी रुपये मंजुर करण्याचा पहिला निर्णय घेतला. तर या सरकारने मुंबईत आरे शेडसाठी जंगल कापण्याचा निर्णय घेतला. मंत्रीमंडळाच्या शेवटच्या बैठकीत औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. जे बोललो, ते करुन दाखवलं, अनेक विकास कामे केली असे ते म्हणाले. करोनाच्या काळात उद्धव ठाकरे यांच्या दोन शस्त्रक्रिया झाल्या. हे सर्वांनाच माहित आहे. त्यामुळे ते कुणालाच जास्त भेटु शकत नव्हते. अशा परिस्थितीत ज्यांच्यावर विश्वास टाकला त्यांनीच दगाबाजी करत चांगल्या माणसांच्या पाठीत खंजीर खुपसला हे जनता विसरणार नाही. ही केवळ उद्धव ठाकरे यांच्याशी नाही पक्षाशी नाही, राज्याशी नाही तर माणुसकीशी गद्दारी आहे असे ते म्हणाले. या संवाद यात्रेत जागोजागी शिवसैनिकांचे प्रेम मला मिळत असुन आपल्या प्रेमामुळे या शिवसेनेची नव्याने उभारणी करु या असे ते म्हणाले.

जाहीर सभेनंतर आदित्य ठाकरे यांनी वैजापुरचे माजी आमदार दिवंगत आर.एम. वाणी यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधला.