मिर्जा अब्दुल कय्युम नदवी यांना श्याम देशपांडे स्मृती ग्रंथसखा पुरस्कार

औरंगाबाद,२२ जुलै /प्रतिनिधी :- वाचनसंस्कृती रुजावी यासाठी आयुष्यभर निरपेक्ष धडपड करणाऱ्या श्याम देशपांडे यांच्या स्मरणार्थ ‘ संडे क्लब ‘ आणि देशपांडे परिवारातर्फे ‘ श्याम देशपांडे ग्रंथसखा पुरस्कार ‘ दिला जाणार आहे.या पुरस्कारासाठी मिर्जा अब्दुल कय्युम नदवी यांची निवड करण्यात आली आहे.रोख रक्कम आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप असून त्याचे वितरण १४ ऑगस्ट रोजी केले जाणार आहे.

मनोविकास ‘ प्रकाशनाचे अरविंद पाटकर यांच्या हस्ते आणि मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले – पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित पुरस्कार वितरण कार्यक्रमास जेष्ठ समीक्षक डॉ.सुधीर रसाळ आणि न्या. नरेंद्र चपळगावकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

श्री.मिर्जा अब्दुल कय्युम नदवी हे वाचनसंस्कृती रुजावी यासाठी तळमळीने प्रयत्नशील राहिले असून ‘ मोहल्ला लायब्रररी ‘ , पुस्तक वाटप आदी उपक्रमात ते हिरिरीने पुढाकार घेतात. विद्यार्थ्यांमध्ये लिहिण्या – वाचण्याची आवड निर्माण व्हावी आणि भाषाप्रेम रुजावे यासाठी सुरू असलेल्या त्यांच्या विधायक धडपडीची नोंद घेण्यासाठी त्यांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आल्याचे ‘ संडे क्लब ‘ ने म्हटले आहे.

श्याम देशपांडे हे पुस्तकप्रेमी तसेच पुस्तकप्रेमींचे मित्र होते.मराठवाडा साहित्य परिषद , सरस्वती भुवन शिक्षण संस्था इत्यादी संस्थांशी त्यांचा संबंध होता.औरंगाबाद शहरातील विविध साहित्यिक तसेच सांस्कृतिक उपक्रमात त्यांचा निरपेक्ष आणि स्नेहशील सहभाग राहात आला.गतवर्षी १४ ऑगस्टला त्यांचे आकस्मिक निधन झाले.या पुरस्कारात दिले जाणारे स्मृतिचिन्ह ख्यातनाम कलावंत विवेक रानडे यांनी साकारले आहे.