पाल्याचे आभासी अपहरण करून खंडणी मागणाऱ्या सायबर भामट्यांपासून सावध राहा

पाल्याचे आभासी अपहरण करून खंडणी मागणाऱ्या सायबर भामट्यांपासून सावध राहा

‘महाराष्ट्र सायबर’चे पालकांना आवाहन

मुंबई दि.१ :- पाल्याचे आभासी अपहरण करून खंडणीची मागणी करणाऱ्या सायबर भामट्यांपासून सावध राहावे, असे आवाहन ‘महाराष्ट्र सायबर’तर्फे  करण्यात येत आहे.

सध्याच्या काळात सायबर भामट्यांनी लोकांची आर्थिक फसवणूक करण्यासाठी नवीन तंत्राचा अवलंब केला आहे. यामध्ये सायबर भामटे आधी सोशल प्रोफायलिंग (social profiling) करून  शक्यतो अशा जोडप्यांना लक्ष करतात जिथे आई, वडील दोघेही नोकरी करतात आणि त्यांचे पाल्य एकटे असते किंवा त्याच्याकडेपण  मोबाईल असतात.

सायबर भामटे विविध सोशल मिडियाद्वारे अशा पाल्यांशी मैत्री करतात आणि त्यांचे फोटो , पालकांची माहिती  काढून घेतात . त्यानंतर पाल्यास काही काळाकरिता आपला मोबाईल बंद करायला सांगतात, त्याच सुमारास सदर पालकांस  खोटे व्हिडीओ बनवून किंवा फेक फोटो  बनवून आपल्या पाल्याचे अपहरण झाले आहे अशा आशयाचा फोन करतात किंवा मेसेज पाठवतात . या मेसेजमध्ये पाल्यास सोडविण्यासाठी काही ठराविक खंडणी मागितली जाते व पालक घाबरून ती खंडणी भामट्याने सांगितलेल्या बँक खात्यात  जमादेखील करतात . इथे सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रत्यक्षात अपहरण झाले नसले तरी पालकांना तंत्रज्ञानाचा उपयोग करून फसविले जाते.  अपहरणाचा आभास निर्माण केला जातो ज्यामुळे घाबरून पालक खंडणी देतात. यामध्ये खंडणी कमी वेळात नमूद बँक खात्यात ट्रान्सफर करण्यास सांगितले असते .पालक घाबरून जाऊन पाल्याच्या सुरक्षिततेच्या भीतीने व काळजीपोटी सारासार विचार न करता खंडणी भरून मोकळे होतात.

वरील नमूद प्रकार हे परदेशात जास्त होत असले तरी , आपण इथे सतर्क राहणे जरुरीचे आहे. तुम्ही तुमच्या पाल्याकडे शक्यतो एकदम साधा फोन द्या ज्यामुळे आपले पाल्य आपल्या नकळत जास्त सोशल मीडियावर वावरणार नाही व सायबर भामट्यांचा संपर्कात येण्याची शक्यता कमी होईल. पालकांनीसुद्धा सोशल मीडियावर वावरताना आपली काय माहिती सोशल मीडियावर प्रसारित करायची याचे तारतम्य बाळगले पाहिजे.अशा प्रकारचा अनोळखी मेसेज आला तर शक्यतो त्या अपहरणकर्त्याचा फोनवर संपर्क होतो आहे का याची खात्री करा. अशा प्रकारचे मेसेज आल्यावर आपले पाल्य कुठे आहे किंवा असू शकेल याचा आधी शोध घ्या. आपल्या पाल्याशी सतत संपर्कात राहा  .

अशा प्रकारचे मेसेज आल्यावर घाबरून न जाता त्याची तक्रार नजीकच्या स्थानिक पोलीस स्टेशन मध्ये नोंदवा. असे आवाहन ‘महाराष्ट्र सायबर’चे विशेष पोलीस महानिरीक्षक यांचेमार्फत करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *