द्रौपदी मुर्मू देशाच्या १५व्या राष्ट्रपती

यशवंत सिन्हा यांचा पराभव

नवी दिल्ली : केंद्रातील सत्ताधारी एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू या देशाच्या १५व्या राष्ट्रपती ठरल्या आहेत. त्या देशाच्या पहिल्या आदिवासी व दुसऱ्या महिला राष्ट्रपती आहेत. राष्ट्रपतीपदासाठी झालेल्या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू या प्रचंड मतांनी विजयी झाल्या. पहिल्याच फेरीत त्यांना ५४० मतं मिळाली. पहिली फेरी पूर्ण होताच देशभरात आनंदोत्सवाला सुरुवात झाली. देशातील पहिली आदिवासी महिला राष्ट्रपती पदावर निवडून आल्याने सर्वंच ठिकाणाहून आनंदाचा वर्षाव होत आहे.आदिवासी पाड्यांवर देखील मोठ्या प्रमाणात आनंदोत्सव करण्यात आला.

राष्ट्रपतीपदासाठी १८ जुलै रोजी मतदान झाल्यानंतर आज गुरुवारी (ता. २१) जुलै रोजी सकाळी ११ वाजता संसद भवनात मतमोजणीला सुरुवात झाली. या निवडणुकीत एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू आणि विरोधी पक्षातर्फे यशवंत सिन्हा हे दोन उमेदवार रिंगणात होते. विशेष म्हणजे १५ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी प्रतिभाताई पाटील यांच्या रूपाने देशाला पहिल्या महिला राष्ट्रपती मिळाल्या होत्या. यंदाच्या निवडणूकीतही महिला उमेदवार असल्याने निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पहिल्याच फेरीत भाजपच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना ५४० मतं मिळाली. तर विरोधी पक्षाचे उमेदवार यशवंत सिन्हा यांना अवघी २०८ मतं मिळाली. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत १५ खासदारांची मतं अमान्य ठरली.द्रौपदी मुर्मू येत्या २५ जुलै रोजी राष्ट्रपतीपदाचा पदभार स्वीकारतील. याआधी प्रतिभाताई पाटील यांना पहिल्या महिला राष्ट्रपती होण्याचा मान मिळाला होता.

दुसऱ्या फेरीत ८१२ मतांच्या फरकाने आघाडीवर

मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर सुरुवातीपासूनच द्रौपदी मुर्मू आघाडीवर होत्या. मतमोजणीच्या दुसऱ्या फेरीत त्या ८१२ मतांच्या फरकाने आघाडीवर आहेत. मुर्मू यांना दुसऱ्या फेरीपर्यंत १३४९ मते मिळाली. या मतांचे मूल्य ४,८३,२९९ आहे. तर दुसऱ्या फेरीपर्यंत सिन्हा यांना ५३७ मते मिळाली होती. या मतांचे मुल्य १,८९, ८७६ आहे.

मतमोजणीच्या तिसऱ्या फेरीत मुर्मू यांना मिळाली ५० टक्क्यांपेक्षा जास्त मते

मतमोजणीच्या तिसऱ्या फेरीत कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, मणिपूर, मेघालय, मिझोरम, नागालँड, ओदिशा आणि पंजाब या राज्यातील लोकप्रतिनिधींनी दिलेल्या मतांची मोजणी करण्यात आली. या फेरीत एकूण १३३३ मते वैध ठरली. यातील ८१२ मते मुर्मू यांना तर ५२१ मते सिन्हा यांना मिळाली. मतमोजणीच्या तिसऱ्या फेरीपर्यंत ३२१९ मते वैध ठरली. या मतांचे मूल्य ८,३८,८३९ एवढे ठरले. तिसऱ्या फेरीपर्यंतच्या वैध मतापैंकी मुर्मू यांना २१६१ मते मिळाली, ज्याचे मूल्य ५,७७,७७७ एवढे आहे. तर सिन्हा यांना १०५८ मते मिळाली. या मतांचे मूल्य २६१०५२ एवढे आहे. म्हणजेच तिसऱ्या फेरीपर्यंत वैध मतांपैकी ५० टक्क्यांपेक्षाही जास्त मते मुर्मू यांना मिळाली.

१७ खासदारांची मतं फुटली

राष्ट्रपतीपदाच्या या निवडणुकीत देशभरातील एकूण १७ खासदारांची मतं फुटली आहेत. या खासदारांनी एनडीए पुरस्कृत उमेदवार द्रौपदी मुर्मू यांच्या बाजूने मतदान केला. परिणामी मुर्मू शेवटपर्यंत आघाडीवर राहिल्या आणि त्यांचा विजय झाला.

दरम्यान, मुर्मू यांच्या विजयानंतर पोस्टरमध्ये द्रौपदी मुर्मूंसोबत इतर कोणत्याही नेत्याचा फोटो लावू नये, अशा सक्त सूचना पक्ष कार्यकर्त्यांना देण्यात आल्या आहेत. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीपासून पक्षाने २०२४ मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीची तयारी सुरू केल्याचे मानले जात आहे.

पंतप्रधानांनी द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली

Image

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली आणि भारताच्या राष्ट्रपती म्हणून त्यांची निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले.

ट्वीट संदेशाद्वारे पंतप्रधान म्हणाले;

“द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले.”

“भारताने इतिहास घडविला! यावेळी 130 कोटी भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असताना, पूर्व भारताच्या दुर्गमभागातील आदिवासी समुदायात जन्मलेल्या भारताच्या या  सुकन्येची आपल्या देशाची राष्ट्रपती म्हणून निवड झाली आहे!या विजयाबद्दल द्रौपदी मुर्मू यांचे अभिनंदन.”

“द्रौपदी मुर्मू यांचे जीवन, लहान वयापासून त्यांनी केलेला संघर्ष, त्यांची उत्तम सेवाभावी वृत्ती आणि अनुकरणीय यश प्रत्येक भारतीयाला प्रेरणा देत आहे. देशाच्या नागरिकांसाठी, विशेषतः गरीब, वंचित आणि पददलितांसाठी त्या आशेचा किरण म्हणून उदयाला आल्या आहेत.”

“द्रौपदी मुर्मू यांनी आमदार तसेच खासदार म्हणून उल्लेखनीय कार्य केले आहे. झारखंडच्या राज्यपाल म्हणून त्यांची कारकीर्द अत्यंत उत्तम होती.त्या राष्ट्रपती म्हणूनही उत्कृष्ट कार्य करतील आणि भारताच्या विकास यात्रेत आघाडीवर राहून विकासाला अधिक बळकटी देतील.”

“राजकीय पक्षमर्यादांच्या पलीकडचा विचार करून द्रौपदी मुर्मू यांच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीला पाठींबा देणाऱ्या सर्व खासदार आणि आमदारांचे मी आभार मानतो. त्यांचा हा विक्रमी विजय आपल्या लोकशाहीसाठी अत्यंत शुभशकून ठरणार आहे.”

कोण आहेत दौपदी मुर्मू? 

मुर्मू यांचा जन्म 20 जून 1958 रोजी ओरिसात झाला. मृमू यांचं पदवी शिक्षण भुवनेश्वरच्या रमादेवी महिला महाविद्यालयातून झालं. मुमृ यांनी पदवीनंतर शिक्षक म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. त्यांनी काही वर्ष ज्ञानदानाचं कार्य केलं.

सिंचन आणि उर्जा विभागात नोकरी

मुर्मृ यांनी सिंचन आणि विभागात 1979 ते 1983 दरम्यान ज्युनिअर असिस्टंट (कनिष्ठ सहाय्यक) म्हणून काम केलं. त्यानंतर मृमू यांनी 1994 ते 1997 हे 3 वर्ष  रायरंगपूरमधील अरबिंदो इंटीगरल एज्युकेशन सेंटरमध्ये सहाय्यक शिक्षिका म्हणूनही काम केलं.

द्रौपदी मुर्मृ वैयक्तिक जीवनातील संघर्ष

द्रौपदी मुर्मू देशाच्या 15व्या राष्ट्रपती, वाचा थक्क करणारा जीवनप्रवास

मृमू यांच्या जीवनात एक काळ असा होता जेव्हा त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. त्यामुळे मुर्मृ मानसिकरित्या पूर्णपणे तुटल्या होच्या. मुर्मृ यांना 2009 मध्ये मोठा धक्का बसला. मुर्मृ यांच्या मोठ्या मुलाचा वयाच्या 25 वर्षी रस्ते अपघातात मृत्यू झाला. आपल्या मुलाच्या मृत्यूचा धक्का सहन करणं खूप कठीण झालं. 

राष्ट्रपतीपदासाठी द्रौपदी मुर्मू यांच्या नावाची घोषणा झाली, तेव्हा त्यांना उमेदवारी देऊन भाजपने मोठा डाव खेळल्याचे राजकीय जाणकारांचे म्हणणे होतं. भाजपने एका दगडात 2 पक्षी मारले. 

भाजप आदिवासी व्होट बँकवर भर देत आहे. कारण येत्या काळात 5 राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. गुजरात, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये काही महिन्यांत निवडणुका होणार आहेत. या राज्यांमध्ये आदिवासींची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे पक्षाच्या नियोजनासाठी आदिवासी मतदार अत्यंत महत्त्वाचे आहेत.

उत्तम शिक्षिका ते भारताच्या राष्ट्रपती हा द्रौपदी मुर्मू यांचा प्रवास थक्क करणारा आहे. ओडिशातील एका शहराच्या नगरसेविका आता देशाची प्रथम नागरिक होतेय. आदिवासी समाजातून आलेल्या पहिल्या राष्ट्रपती एवढीच द्रौपदी मुर्मू यांची ओळख मर्यादित नाही. 

जीवनामध्ये अनेक चढउतार, नैराश्य, त्या नैराश्यावर यशस्वीपणे केलेली मात हा त्यांचा जीवनप्रवास कुणालाही प्रेरणा देईल असाच आहे. आपण कधीकाळी राजकारणात येऊ, असं त्यांना स्वप्नातही वाटलं नव्हतं.

कारकुनी ते प्राध्यापक
1979मध्ये त्यांनी भुवनेश्वरच्या रमादेवी महिला कॉलेजमधून पदवी घेतली.  त्यांची पहिली नोकरी होती राज्य सरकारच्या सिंचन विभागात.  पण कारकुनीमध्ये मत रमलं नाही आणि त्या मयूरभंजमधील कॉलेजमध्ये साहाय्यक प्राध्यापिका झाल्या. 1997 साली त्यांच्या आयुष्याला मोठी कलाटणी मिळाली. त्यांनी राजकारणात प्रवेश केला आणि मयूरभंजच्या रंगरायपूर वॉर्डातून त्या नगरसेविका झाल्या. त्यानंतर 2 वेळा आमदार आणि 2000 ते 2004 या काळात ओडिशा सरकारमध्ये राज्यमंत्री झाल्या. 2015मध्ये त्यांची झारखंडच्या राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली.

Presidential Election 2022 : भारताच्या राष्ट्रपतीपदी द्रौपदी मुर्मू

पहिल्या महिला आदिवासी राष्ट्रपती

देशात आतापर्यंत आदिवासी समुदायातील कोणीही व्यक्ती राष्ट्रपती बनलेली नव्हती. मात्र द्रौपदी यांच्या रूपाने देशाला पहिला आदिवासी राष्ट्रपती मिळालाय.

भारताचे आतापर्यंतचे राष्ट्रपती 

अनु. क्रमांक राष्ट्रपतीचं नावकार्यकाळ
1राजेंद्र प्रसाद1950-1962
2सर्वपल्ली राधाकृष्णन1962-1967
3झाकीर हुसेन1967-1969
4 व्ही.व्ही.गिरी1969-1974
5फखरुद्दीन अली अहमद1974-1977
6नीलम संजीव रेड्डी1977-1982
7ग्यानी झैल सिंग1982-1987
8आर.व्यंकटरमण1987-1992
9शंकर दयाळ शर्मा1992-1997
10के.आर.नारायणन1997-2002
11ए.पी.जे. अब्दुल कलाम2002-2007
12प्रतिभाताई पाटील2007-2012
13प्रणब मुखर्जी2012-2017
14रामनाथ कोविंद2017-2022
15द्रौपदी मुर्मु2022-2027 पर्यंत  

एकनाथ शिंदेंचा 200 मतांचा दावा फोल!

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मुर्मू यांना महाराष्ट्रातून 200 पेक्षा जास्त मतं पडतील, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला होता, पण त्यांचा हा दावा फोल ठरलेला दिसत आहे.

महाराष्ट्रातून द्रौपदी मुर्मू यांना 181 तर यशवंत सिन्हा यांना 98 मतं मिळाली. राज्याच्या 283 आमदारांनी मुर्मू यांना मत दिलं, यातली 279 मतं अधिकृत धरण्यात आली. रमेश लटके यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या विधानसभेची संख्या 287 एवढी आहे. यातले नवाब मलिक आणि अनिल देशमुख जेलमध्ये असल्यामुळे राष्ट्रपती निवडणुकीत मतदान करू शकले नाहीत. तर भाजपचे लक्ष्मण जगताप आजारपणामुळे मतदानाला येऊ शकले नाहीत. शिवसेनेचे बंडखोर आमदार महेंद्र दळवी हे कोर्टात दोषी आढळल्यामुळे मतदानापासून वंचित राहिले.

नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून अभिनंदन

मुंबई :- भारताच्या सर्वोच्च अशा राष्ट्रपती पदावर निवड झाल्याबद्दल श्रीमती द्रौपदी मुर्मू यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनंदन केले आहे. ‘श्रीमती मुर्मू यांची निवड भारतीय महिला जगत तसेच आदिवासी समाजाच्या दृष्टीने ऐतिहासिक आणि अभिमानास्पद अशी आहे. हा क्षण आपल्या सर्वांसाठी प्रखर राष्ट्राभिमान जागृत करणारा आनंदी क्षण आहे,’असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्री या संदेशात म्हणतात, राष्ट्रपती पदावर श्रीमती द्रौपदी मुर्मू यांची झालेली निवड आपल्या सर्वांसाठी अभिमानास्पद अशीच आहे. आदिशक्ती म्हणून मातृभक्त, स्त्री शक्ती समोर नतमस्तक होणारी संस्कृती अशी आपल्या संस्कृतीची ओळख आहे. भारताने नेहमीच महिला सबलीकरणासाठी पहिले पाऊल टाकून जगासमोर आदर्श ठेवला आहे. याच परंपरेचा गौरव आणि अभिमान म्हणून श्रीमती मुर्मू यांची निवड ओळखली जाईल. आदिवासी समाजातून येऊनही उच्चशिक्षीत आणि समाजकारणात अग्रभागी राहिलेलं नेतृत्व म्हणून श्रीमती मुर्मू यांची ओळख आहे. त्यांच्या निवडीने आदिवासी समाजालाही सर्वोच्च असा बहुमान लाभला आहे. यातून या समाजाच्या प्रगतीसाठी आणि त्यातील विविध घटकांना विकासाच्या प्रवाहात सामावून घेण्याच्या प्रक्रियेला मोठा हातभार लागणार आहे. श्रीमती मुर्मू आपल्या पदाच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचा गौरव वाढवण्यासाठी आणि बलशाली प्रजासत्ताक निर्मितीसाठी महत्वाचे योगदान देतील, हा दृढ विश्वास आहे. त्यांची निवड हा मना मनात प्रखर राष्ट्राभिमान जागृत करणारा क्षण आहे. या निवडीसाठी श्रीमती मुर्मू यांचे मनापासून अभिनंदन आणि त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी आदरपूर्वक शुभेच्छा‌.