नशेच्‍या गोळ्यांची अवैधरित्‍या विक्री:आरोपीला तीन वर्षे सक्तमजुरी

औरंगाबाद,२१ जुलै /प्रतिनिधी :- नशेच्‍या गोळ्यांची अवैधरित्‍या विक्री करणारा आरोपी शेख अतीफ शेख अब्दुला (४२, रा. चेलीपुरा) याला तीन वर्षे सक्तमजुरी आणि विविध कलमांखाली अडीच हजारांच्‍या दंडाची शिक्षा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्‍यायाधीश विजय कुलकर्णी यांनी गुरुवारी ठोठावली.

या प्रकरणात अन्न व औषध प्रशासनाच्‍या तत्कालीन अधिकारी वर्षा महाजन यांनी फिर्याद दिली होती. त्‍यानूसार, १८ ऑक्टोबर २०१९ रोजी सिटीचौक पोलिस  ठाण्‍याच्या निरीक्षकांना माहिती मिळाली होती की, एक व्‍यक्ती निजोम्मोदीन चौकात अवैधरित्‍या नशेच्‍या गोळ्या बाळगुन त्‍याची विक्री करित आहे. माहिती आधारे पोलिस  व अन्न औषधी विभागाने संयुक्त कारवाई करुन आरोपी शेख अतीफ याला पकडले. त्‍याच्‍या झडतीतून पोलिसांनी निट्रोझेपम निट्रार्वेट नावाच्‍या १८७ नशेच्‍या गोळ्या हस्‍तगत केल्या. या प्रकरणात सिटीचौक पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला.

तपासअधिकारी तथा उपनिरीक्षक पाथरकर यांनी न्‍यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. खटल्याच्‍या सुनावणी वेळी सहायक लोकाभियोक्ता उल्हास पवार यांनी न्‍यायालयाच्‍या निदर्शनास आणुन दिले की, आरोपीने नशेच्‍या गोळ्या बाळगल्या आहेत. त्‍याच्‍या सेवनामुळे लहान मुले आणि इतर लोकांमध्‍ये गुन्‍हेगारी प्रवृत्तीचे प्रमाण वाढलेले आहे. त्‍यामुळे आरोपीला जास्‍तीत जास्‍त शिक्षा द्यावी. जेने करुन समाजात कृत्‍य करणाऱ्यास धाक बसेल.

दोन्ही बाजुंच्या युक्तीवादानंतर साक्ष-पुराव्यांवरुन न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवून भादंवी कलम ३२८ अन्‍वये तीन वर्षे सक्तमजुरी आणि दोन हजार रुपये दंड, कलम २७६ अन्‍वये सहा महिने सक्तमजुरी आणि ५०० रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.