गोदावरीवरील कमालपूर बंधारा दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून देणार आ.रमेश बोरणारे

आ.बोरणारे यांच्या आश्वासनानंतर बंधारा दुरुस्तीचे काम सुरू

वैजापूर,२१ जुलै /प्रतिनिधी :- नगर जिल्हा व मराठवाड्याला जोडणारा गोदावरी नदीवरील कमालपूर येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यावरील रस्ता पुराच्या पाण्यामुळे वाहून गेल्याने गंगथडी भागातील नागरिकांना सध्या मोठी कसरत करून बंधाऱ्यावरून प्रवास करावा लागत आहे. गेल्या चार – पाच वर्षांपासून या भागातील ग्रामस्थ लोकवर्गणीतून मुरूम व दगड टाकून दळणवळणासाठी रस्ता तयार करीत आहेत. गोदावरीला आलेल्या पुरामुळे यावर्षीही बंधाऱ्यावरील रस्ता वाहून गेला असून याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे. वैजापूरचे आमदार रमेश पाटील बोरणारे यांनी याची दखल घेऊन बंधारा व रस्त्याच्या दुरुस्तीचे काम तातडीने सुरू करा यासाठी लागणारा निधी उपलब्ध करून देतो असे आश्वासन  या भागातील कार्यकर्ते व ग्रामस्थांना दिल्याने कमलापूर बंधारा दुरुस्तीचे काम सुरू झाले आहे.
मराठवाड्यातील वैजापूर व गंगापूर तालुक्यातील गोदाकाठच्या बहुतांश गावांचा शेजारच्या नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्याशी दररोजचा संपर्क असतो. शिक्षण, किराणा, कपडे, आठवडी बाजार, दूध व्यवसाय, भुसार व कांदा बाजार या सर्वच बाबतीत या भागातील शेतकरी, ग्रामस्थ व विद्यार्थ्यांचे श्रीरामपूर तालुक्याशी दळणवळण जोडलेले आहे. बंधाऱ्यावरील रस्ता पुराच्या पाण्याने वाहून गेल्याने दळणवळण ठप्प झाले असून मूलभूत गरजांसाठी ग्रामस्थांना पुलावरून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. वैजापूर तालुक्यातील नागमठाण, अव्वलगाव, हमरापूर, शनी देवगाव, चेंडूफळ, बाजाठाण तसेच गंगापूर तालुक्यातील वाहेगाव, मांजरी, नेवरगाव आदी गावांतील नागरिकांचे श्रीरामपूर तालुक्याशी शेती निगडीत दळणवळण आहे.मात्र, गेल्या चार-पाच दिवसांपूर्वी गोदावरीला आलेल्या पुराच्या पाण्यात  रस्ताच वाहून गेला आहे.

आतापर्यंत या बंधाऱ्याच्या दुरुस्तीवर कोट्यावधी रुपये खर्च करण्यात आला आहे.तरीही कमालपूर बंधाऱ्याचे दोन्ही बाजूंचे भरभक्कम काँक्रीट बांधकाम झाले नाही.गळीत हंगामात या बंधाऱ्यावरून मोठ्याप्रमाणात ऊस वाहतूक होत असतांनाही साखर कारखाने या बंधाऱ्यावरील रस्त्याच्या दुरुस्तीसाठी मदत करत नाही. मात्र, जिल्हा परिषद सदस्य अविनाश पाटील गलांडे हे दरवर्षी जेसीबी मशीन पाठवून या भागातील नागरिकांच्या मदतीला धावून जातात. येवेळीही त्यांनी रस्ता दुरुस्तीसाठी जेसीबी उपलब्ध करून दिला होता. मुरूम व दगड वाहतूक खर्च खूप मोठा असल्याने लोकवर्गणीसाठी ग्रामस्थ पुढे येईना. बाजाठाणचे माजी सरपंच सुभाष पाटील भराडे यांनी समाज माध्यमांवर या बंधाऱ्यावरील दुरावस्था झालेल्या रस्त्याचा व्हिडीओ टाकून कमलापूर बंधाऱ्यावरील रस्ता दुरुस्तीची मागणी केली होती. आ.रमेश पाटील बोरणारे यांनी याची दखल घेतली व या भागातील ग्रामस्थ व कार्यकर्त्यांशी चर्चा करून बंधारा व रस्ता दुरुस्तीसाठी येणारा संपूर्ण खर्च निधी ताबडतोब उपलब्ध करून देतो असे आश्वासन देऊन काम सुरू करण्याचे आदेश दिले व बंधारा दुरुस्तीचे काम तातडीने सुरू झाले आहे.