सुट्या डाळी, धान्य, दही, लस्सीवरील जीएसटी मागे

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची घोषणा

नवी दिल्ली : आधीच देश महागाईने होरपळ होत असताना केंद्र सरकारने ज्या वस्तूंवर आधी जीएसटी होता, त्यात वाढ केली होती. तर ज्या गोष्टी जीएसटीच्या कक्षेत नव्हत्या त्यांच्यावर जीएसटी आकारायला सुरुवात केली. यावरून संसदेच्या हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षांनी गदारोळ माजविला. जनतेमध्येही प्रचंड रोष निर्माण होऊ लागला आहे. अखेर केंद्र सरकारने माघार घेतली असल्याचे ट्विट केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केले आहे.

केंद्राने खुल्या धान्यावरील जीएसटी मागे घेऊन दिलासा दिला आहे. केंद्र सरकारने सुट्या धान्यावर देखील पाच टक्के जीएसटी आकारला होता. हा जीएसटी मागे घेत असल्याचे सीतारामन यांनी म्हटले आहे. यानुसार सुट्या डाळी, गहू, राई, ओट्स, मका, तांदूळ, पीठ, रवा, बेसन, मुढी, दही आणि लस्सी यावर पाच टक्के जीएसटी लागणार नाही, अशी घोषणा केंद्र सरकारने केली आहे.

गेल्या महिन्यात झालेल्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता. २५ किलो वजनाच्या प्री-पॅकेज केलेल्या आणि लेबल केलेल्या खाद्यपदार्थांवर ५ टक्के जीएसटी लावण्यात आला होता. याची अंमलबजावणी १८ जुलैपासून झाली होती. यामध्ये अनेक वस्तूंचा जीएसटी देखील वाढविण्यात आला आहे. यामुळे अनेक वस्तू, खाद्यपदार्थ महाग झाले आहेत.