खुलताबाद-घृष्णेश्वर-एलोरा राज्य महामार्गास राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा

नवी दिल्ली,१८ जुलै /प्रतिनिधी :- औरंगाबाद जिल्ह्यातील क्षेत्र घृष्णेश्वर या तीर्थस्थळी येणाऱ्या भाविकांच्या व पर्यटकांच्या सुविधेसाठी खुलताबाद-घृष्णेश्वर-एलोरा या राज्य महामार्गास राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्याचा निर्णय केंद्र सरकारच्या वतीने घेण्यात आला आहे, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज ट्विटच्या माध्यमातून दिली.

गडकरींनी म्हटले आहे की, एकूण ६ किमी लांबीच्या या महामार्गामुळे जगप्रसिद्ध वेरुळ लेणी व अजिंठा लेणी वर्तुळ शक्य होईल. देश-विदेशातून येणाऱ्या भाविकांना व पर्यटकांना ऐतिहासिक वारसा असलेले घृष्णेश्वर मंदिर तसेच मंदिरापासून जवळच असलेल्या एलोरा-अजिंठा लेण्यांची प्रसिद्ध गुहा या स्थळांपर्यंत पोहोचणे सुलभ होईल. राष्ट्रीय महामार्गांच्या निर्मितीतून देशातील तीर्थक्षेत्रे व पर्यटन स्थळांचा विकास साधत असताना प्राचीन शंकराचे मंदिर व महाराष्ट्रातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक म्हणून प्रसिद्ध असलेले औरंगाबाद जिल्ह्यातील श्री क्षेत्र घृष्णेश्वर. औरंगाबाद व अजिंठा ही दोन महत्त्वाची शहरे या महामार्गामुळे जोडली जातील. सदर महामार्गामुळे परिसरातील पर्यटन, शैक्षणिक, विशेष आर्थिक क्षेत्रांचा विकास होऊन हा ऐतिहासिक वारसा जगाच्या पटलावर पोहोचवण्यास मदत होईल.

देशातील आध्यात्मिक व पर्यटन क्षेत्रांची महती जगभरात पोहोचवण्यासाठी कटिबद्ध

गडकरी पुढे म्हणाले की, पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली रस्ते व दळणवळणांच्या साधनांच्या माध्यमातून देशातील आध्यात्मिक व पर्यटन क्षेत्रांची महती जगभरात पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. पंतप्रधान मोदींच्या कार्यकुशल नेतृत्वाखाली देशभरात सर्वदूर राष्ट्रीय महामार्गांचे जाळे विणून देशातील तीर्थक्षेत्रांचा व पर्यटन क्षेत्रांचा विकास साधण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

यासोबतच केंद्र सरकारच्या राष्ट्रीय महामार्ग ज्योतिर्लिंग जोडणी प्रकल्पांतर्गत महाराष्ट्रातील ‘खेड- भीमाशंकर’ या मार्गाप्रमाणेच ‘बनकर फाटा-तळेघर’ रस्त्यालाही नवीन राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती गडकरी यांनी दिली. पवित्र १२ ज्योतिर्लिंगांपैकी महाराष्ट्रातील एक असलेले श्री क्षेत्र भीमाशंकर येथे देश-विदेशातून येणाऱ्या भाविकांसाठी व पर्यटकांसाठी सोयीसुविधा निर्माण करण्याच्या दृष्टीने भीमाशंकर व माळशेज घाट हे पर्यटन वर्तुळ शक्य होईल. तसेच भीमाशंकर परिसरातील शेतीमाल मुंबई बंदराकडे पोहोचवणे सुलभ होईल. या महामार्गामुळे परिसरातील वाहतूक सुरळीत होईल व परिसराचा शैक्षणिक व औद्योगिक विकास साधण्यास मदत होईल, असे ते पुढे म्हणाले.