गोदावरीच्या पुरामुळे कमलपूर केटी वेअरवरील पुलाची दुर्दशा ; गंगथडी भागातील विद्यार्थी व शेतकऱ्यांचे हाल

कमलपूर पुलावरील रस्ता त्वरित  दुरुस्त करण्याची  शेतकरी व ग्रामस्थांची मागणी

वैजापूर,१७ जुलै /प्रतिनिधी :- गेल्या पाच-सहा दिवसांपासून गोदावरी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आल्यामुळे गोदावरी नदीला पूर येऊन पुराच्या पाण्यामुळे या नदीवरील कमलपूर केटीवेअरवरील पुलाची अत्यंत दुर्दशा झाली आहे. मराठवाड्याचा पश्चिम महाराष्ट्राशी संपर्क तुटला असून रहदारीसाठी रस्ता नसल्याने गंगथडी भागातील विद्यार्थी व शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या रस्त्याची त्वरित दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी या भागातील ग्रामस्थ व शेतकऱ्यानी  लोकप्रतिनिधीकडे केली आहे.


वैजापूर तालुक्यातील गंगथडी भागातील बाजठाण, अव्वलगांव, गाढेपिंपळगांव,चेंडूफळ आदी गावांतील शेतकरी व विद्यार्थ्यांना शेजारच्या अहमदनगर जिल्हयात शिक्षण व अन्य कामासाठी दररोज येणे जाणे असते. नगर जिल्ह्याला जोडणाऱ्या कमलपूर केटी वेअरवरील पुलाची गोदावरीला आलेल्या पुरामुळे अत्यंत दुरावस्था झाली आहे.

पुलावरून जाण्यासाठी रस्ता नसल्याने रहदारीचा प्रश्न निर्माण झाला आहे. रस्ता नसल्याने गेल्या पाच-सहा दिवसांपासून गंगथडी भागातील अनेक गावांचा नगर जिल्ह्याशी असलेला दररोजचा संपर्क तुटला आहे. यामुळे या भागातील शेतकरी व विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे.


मराठवाड्याला पश्चिम महाराष्ट्राशी जोडणाऱ्या गोदावरी नदीवरील कमलपूर केटी वेअरवरील पुलावरील रस्त्याची त्वरीत दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी बाजाठाण गावचे माजी सरपंच सिताराम पाटील भराडे यांच्यासह या परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांनी आ.रमेश पाटील बोरणारे, जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती अविनाश पाटील गलांडे  व जिल्हा परिषद सदस्य मधुकर वालतुरे यांच्याकडे केलीआहे.