खंडाळा येथे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा मेळावा

वेतन आयोगाचा हप्ता देण्याची मागणी

वैजापूर,१७ जुलै /प्रतिनिधी :- जुलै महिनाला उजाडला तरी सेवानिवृत्त जिल्हा परिषद, शिक्षक व कर्मचारी यांना सातव्या वेतन आयोगाच्या शासनाकडे थकीत असलेल्या तिसऱ्या हप्त्याची रक्कम औरंगाबाद जिल्हा परिषदेने जमा केली नाही  म्हणून वैजापूर तालुक्यातील खंडाळा या गावी रविवारी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा मेळावा झाला.ग्रामीण भागातील निवृत्त जिल्हा परिषद शिक्षक व कर्मचारी यांनी थकीत तिसरा हप्ता त्वरित देण्याची मागणी केली, 

या मेळाव्यात सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा होऊन राज्यातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे सवलती द्याव्यात अशी मागणी करण्यात आली.

रविवारी संत तुकाराम महाराज मंदिरात खंडाळा पंचक्रोशीतील 75 ते 80 वर्षावरील जेष्ठ सेवानिवृत्त शिक्षक व कर्मचारी यांनी आपल्या व्यथा सांगत या थकीत हप्त्याची मागणी केली‌ अनेक जेष्ठ शिक्षक शारीरिक व्याधींनी ग्रस्त आहेत. अनेकांना विविध  आजार आहेत त्यांना गोळ्या, औषधी साठी पैसे नाहीत.आजार तपासणी व उपचार साठी पैसे नाहीत त्यामुळे जिल्हा परिषद, औरंगाबादने तात्काळ  हा थकीत तिसरा हप्ता अदा करावा अशी विनंती वैजापूर पेंशनर्स संघटनेचे तालुका अध्यक्ष धोंडीरामसिंह राजपूत यांनी अध्यक्ष पदावरून बोलतांना केली. जिल्हाधिकाऱ्यांनी जेष्ठ सेवानिवृतांच्या व्यथा समजून घेऊन हा हप्ता अदा करण्यास संबंधितांना त्वरित आदेश द्यावेत असेही राजपूत म्हणाले. राज्य शासकीय सेवा निवृत्त कर्मचारी, खाजगी शाळेतील सेवा निवृत्त
कर्मचारी याना जून महिन्याच्या निवृत्त वेतन सोबत तिसरा हप्ता दिला मग जिल्हा परिषदेच्या सेवानिवृतांची अडवणूक का? पेंशन विभागात कर्मचारी नाही,तांत्रिक अडचणी आहेत ही कारणे पुढे का केल्या जातात? असाही प्रश्न राजपूत यांनी उपस्थित केला. या मेळाव्यात मनूर चे सेवानिवृत्त शिक्षक शेख शाहुर, नामका विभागाचे एम.एस.खान, ई.ए.थोरात, ए.जी.मगर यांनी व्यथा व्यक्त केल्या.

या आहेत मागण्या
केंद्रीय कर्मचाऱ्याप्रमाणे राज्यातील सेवानिवृतांना एक हजार रुपये वैद्यकीय भत्ता मिळावा, 30 जूनला सेवा निवृत्त झालेल्याना जुलैची वेतन वाढ शासन परिपत्रक काढून त्वरित फरकसह द्यावी , सर्वांना न्यायालयात जाऊन दाद मागणे शक्य नाही त्यामुळे बँकांनी पेन्शन देताना अडवणूक करू नये अशी मागणी ही या मेळाव्यात करण्यात आली. 
मेळाव्याच्या सुरुवातीला तालुका संघटनेचे संचालक व मेळावा आयोजक अशोक पवार (आप्पा) यांनी प्रास्ताविक केले. सचिव उत्तमराव साळुंके, कोषाध्यक्ष  अण्णासाहेब शेळके, ठाकूर धोंडिरामसिंह राजपूत, एम.एस.खान, ई.एस.थोरात, डी.एस.कटारे, यू.एल. वाघचौरे, ए.जी.मगर, पी.डी.बोर्डे, बी.बी.बाविस्कर, कृष्णराव कांबळे याशिवाय खंडाळा पंचक्रोशीत सेवा निवृत्त शिक्षक हजर होते. शेवटी श्री पवार यानी आभार मानले.