औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबादचे धाराशिव नामकरण

मुंबई ,१६ जुलै /प्रतिनिधी :- महाविकास आघाडी सरकारने अल्पमतात असताना घेतलेल्या निर्णयाला स्थगिती देत फडणवीस-शिंदे सरकारने नामांतरणाबाबतचे महत्वाचे निर्णय पुन्हा नव्याने घेतले आहेत. २९ जून रोजी झालेले निर्णय हे घटनाबाह्य आणि घाईगडबडीत घेण्यात आले होते. भविष्यात या निर्णयांना कोणीही आव्हान देऊ शकले असते. त्यामुळे शनिवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत औरंगाबादचे ‘संभाजीनगर’, उस्मानाबादचे ‘धाराशिव’ असे नामांतरण करण्यात आले आहे तर नवी मुंबई विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव देण्यात आले आहे.

उपमुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे मंत्रिमंडळाची बैठक झाली. २९ जून रोजी सरकार अल्पमतात होते. त्यावेळी मंत्रिमंडळाने काही निर्णय घेतले होते. पुढे कायदेशीर अडचण निर्माण होऊ नये म्हणून फेर आढावा घेत निर्णय घेतले आहेत.

यासंदर्भात लवकरच याचा कायदा तयार करावा लागतो. विधानमंडळाच्या अधिवेशनात याचा ठराव करावा लागतो. हा ठराव विधानसभेत मंजूर झाल्यानंतर केंद्राकडे पाठविला जाणार आहे. केंद्राकडे पाठपुरावा करून आम्ही लवकरात लवकर मंजूर करून घेऊ, असा विश्वासही यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही महाविकास आघाडीवर बोचरी टिका केली. मावळत्या सरकारने हे निर्णय तर घेतले पण ते सर्व घटनाबाह्य होते. केवळ जबाबदारी झटकून द्यायची म्हणून त्यांनी हा प्रयत्न केला होता. पण आता उगवत्या सूर्याच्या साक्षीने तयार झालेल्या सरकारचे निर्णय आहेत. त्यामुळे घेतलेले निर्णय लवकरच अस्तित्वातही येणार असल्याचेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवीसांनी सांगितले.मावळत्या सरकारप्रमाणं जबाबदारी झटकण्याचे निर्णय नाहीत. उगवत्या सूर्याच्या साक्षीने स्थापन झालेल्या सरकारने जबाबदारी घेत हे निर्णय घेतले आहेत. विधिमंडळात या निर्णयांचे कायद्यात रुपातंर करण्यात येईल. त्यानंतर ते केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी पाठवले जातील. तिथे पाठपुरावा करुन आम्ही हे मंजूर करुन घेऊ, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Image

औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबादचे धाराशिव नामकरण

औरंगाबाद शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबाद शहराचे नाव धाराशिव करण्याबाबतच्या प्रस्तावास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

नामकरणाबाबतच्या प्रस्ताव मंजुरीचे 29 जून 2022 रोजीच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीचे कार्यवृत्त मान्यतेसाठी नव्याने स्थापन झालेल्या मंत्रिमंडळासमोर आणण्यात आले होते. त्यावर हे दोन्ही प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी फेरसादर करावेत असे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार हे प्रस्ताव आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत फेरसादर करण्यात आले. त्यावर या दोन्ही प्रस्तावांना मंत्रिमंडळाने मान्यता दिली.

हे प्रस्ताव केंद्र शासनास पाठविण्यात येऊन त्यानंतर त्याप्रमाणे विभाग, जिल्हा, तालुका तसेच महानगरपालिका व नगरपालिका यांचे नामांतर करण्यात येईल. याबाबतची कार्यवाही स्वतंत्रपणे महसूल व वन विभाग तसेच नगरविकास विभागाकडून अधिनियमांप्रमाणे करण्यात येईल.

—–०—–

नवी मुंबई विमानतळाचे लोकनेते दि.बा.पाटील नवी मुंबई विमानतळ नामकरण

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे ‘लोकनेते दि.बा.पाटील नवी मुंबई विमानतळ’ असे नामकरण करण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

नामकरणाबाबतचा प्रस्तावाच्या मंजुरीचे 29 जून 2022 रोजीच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीचे कार्यवृत्त मान्यतेसाठी नव्याने स्थापन झालेल्या मंत्रिमंडळासमोर आणण्यात आले होते. त्यावर हा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी फेरसादर करावेत असे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार हा प्रस्ताव आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत फेरसादर करण्यात आला व त्याला मंत्रिमंडळाने मान्यता दिली.

नवी मुंबईमधील प्रकल्पग्रस्तांच्या मागणीनुसार 12.56 योजनेच्या अंमलबजावणीसाठी स्व. पाटील यांचे योगदान आहे. तद्नंतर आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पासाठी संपादित जमिनीसाठी मोबदला ठरवावयाच्या अनुषंगाने निश्चित करण्यात आलेले 22.5% योजनेचे धोरणसुद्धा 12.5% धोरणाच्या धर्तीवर तयार करण्यात आले आहे.

नवी मुंबई येथे सिडको महामंडळाच्या माध्यमातून 1160 हे. क्षेत्रावर सार्वजनिक खाजगी भागीदारीतून ग्रीनफील्ड विमानतळ विकसित करण्यात येत आहे. या संपूर्ण 1160 हे. जमिनीचे संपादन पूर्ण झाले असून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाची भूविकास कामे प्रगतीपथावर आहेत. या विमानतळाच्या नामकरणाच्या अनुषंगाने नवी मुंबईमधील विविध संघटना व राजकीय पक्षांकडून मागणी करण्यात येत होती.

नवी मुंबई परिसरातील विकासामधील दि.बा. पाटील यांचे योगदान व स्थानिकांच्या विविध संघटनांची मागणी विचारात घेता, नवी मुंबईत होत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नामकरण लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई विमानतळ असे करण्यास आज मान्यता देण्यात आली.

—–०—–

एमएमआरडीएच्या विविध प्रकल्पांसाठी बँक कर्जाला शासनाची हमी

एमएमआरडीएला मुंबई महानगर क्षेत्रात विविध प्रकल्प राबविण्यासाठी 60 हजार कोटींपर्यंतचे कर्ज उभारण्यास तसेच शासन हमीस आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या कर्जापैकी पहिल्या टप्प्यात उभारण्यात येणाऱ्या 12 हजार कोटी रकमेची शासन हमी देण्यास आणि शासन हमीवरील मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत मुंबई महानगर क्षेत्रात 1 लाख 74 हजार 940 कोटी किंमतीचे महत्त्वाकांक्षी पायाभूत प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. यामध्ये विविध मेट्रो रेल प्रकल्प, बोरीवली- ठाणे भुयारी मार्ग, ठाणे कोस्टल रोड व शिवडी वरळी कनेक्टर, इत्यादी महत्वाच्या प्रकल्पांचा समावेश आहे. प्राधिकरणामार्फत हाती घेण्यात आलेल्या या प्रकल्पांना निधी उपलब्ध होऊन प्रकल्प विहित वेळेत पूर्ण करण्याच्या दृष्टीने हे निर्णय घेण्यात आले.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अधिनियमातील कलम 21 नुसार शासनाची पूर्वमान्यता घेण्याची तरतूद विचारात घेता महत्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्राधिकरणास आवश्यकतेनुसार 60 हजार कोटीपर्यंतचे कर्ज उभारण्यास शासनाची मान्यता प्रदान करण्यात आली.


संभाजीनगर नामांतरावर शिक्कामोर्तब ; शिंदे – फडणवीस समर्थकांचा जल्लोष

वैजापूर,१६ जुलै /प्रतिनिधी :- राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज औरंगाबाद शहराचे “छत्रपती संभाजीनगर” असे नामांतर करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. या निर्णयाचे शिंदे- फडणवीस समर्थकांनी स्वागत करून जल्लोष साजरा केला.शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ आ.रमेश पाटील बोरणारे, नगरसेवक स्वप्नील जेजुरकर,भाजपचे शैलेश पोंदे, सन्मित खनिजो, प्रदीप साळुंके आदींसह कार्यकर्त्यांनी जल्लोष केला व शिंदे- फडणवीस सरकारचे आभार मानले.

गुलमंडी येथे जल्लोष

May be an image of 2 people, people sitting, people standing, crowd and road

शिंदे -फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत औरंगाबादचे नामकरण “छत्रपती संभाजीनगर” होणार असल्याची घोषणा केल्याबद्दल आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने गुलमंडी येथे कार्यकर्त्यांसह उत्साहात जल्लोष साजरा करण्यात आला.