औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराचा निर्णय कॅबिनेटमध्ये नव्याने घेऊ-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

५० आमदारांची जबाबदारी माझीच; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विश्वास

मुंबई ,१५ जुलै /प्रतिनिधी :- आम्ही शिवसेनेसाठी पूर्ण आयुष्य खर्ची केले. मग आम्ही बंडखोर कसे? आमदारांच्या भावना अनेकदा बोलून दाखवल्या. पण ऐकून घेतल्या गेल्या नाहीत. सत्तेत असूनही आपला पक्ष चौथ्या क्रमांकावर जात होता, हे पाहून काळीज तुटत होते. मग छातीवर दगड ठेवून शिवसेनेला वाचविण्यासाठी निर्णय घेतला. शिवसैनिकांना वाचवण्यासाठी आम्ही उठाव केला आणि त्याला ५० आमदारांनी पाठिंबा दिला. या ५० आमदारांची सर्वस्वी जबाबदारी माझी आहे, असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

मुंबईत रवींद्र नाट्य मंदिरात आमदार अब्दुल सत्तार यांनी एकनाथ शिंदे यांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला होता, यावेळी ते बोलत होते. औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराचा निर्णय या आधीच्या सरकारने बेकायदेशीरपणे घेतला होता. राज्यपालांच्या बहुमत सिद्ध करण्याच्या पत्रानंतर बेकायदेशीरपणे कॅबिनेट घेऊन निर्णय घेतले होते. हे निर्णय आम्ही उद्याच्या कॅबिनेटमध्ये नव्याने घेऊ, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

Image

आम्ही उठाव केला आणि बघता बघता ५० आमदार सोबत आले. त्यातल्या एकाही आमदाराला निराश करणार नाही. सर्वांची कामे मार्गी लावणार आहे. काही लोक बोलतात, अजूनही मंत्रालय सुरू नाही. पण मी जिथे जातो तिथे मंत्रालय असते. सर्व कामे मी एका फोनवर करतो. पंतप्रधान मोदींनीही जेव्हा हे पाहिले, तेव्हा त्यांनीही हे शिवसैनिक उठावातून एकत्र आले आहेत. हे दिघे साहेबांच्या तालमीत घडलेले आहेत. यांना आपण पाठिंबा दिला पाहिजे, असे त्यांनी ठरवले आणि त्यांनी मला मुख्यमंत्री केले. मोदींनी मला मुख्यमंत्री केले आणि सर्वांची तोंडे बंद झाली, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

Image

औरंगाबादचे संभाजीनगर होणारच : फडणवीस

औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशीव असे नामकरण होणारच, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. औरंगाबाद शहराचे नामकरण संभाजीनगर असे होणारच, नामांतराला स्थगिती दिली जाणार नाही, असे फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. ‘‘औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशीव किंवा नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देणे या मागण्यांना मागील सरकारने अडीच वर्षांत हात लावला नाही. मात्र बहुमत गमावल्यानंतर बैठक बोलावून निर्णय घेतले. हे संकेतांना धरून नाही,” असे फडणवीस म्हणाले. ही नावे द्यायची आहेत. आमचा अजेंडा हाच असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

धनुष्यबाण आमचाच : अब्दुल सत्तार

शिंदे यांचे सरकार स्थापन झाल्यावर आमच्या मतदारसंघाला निधी मिळाला. त्याचबरोबर ही शिवसेना ओरिजनल असून धनुष्यबाण आमचाच, असल्याचा दावा आमदार अब्दुल सत्तार यांनी केला. जगातल्या कोणत्याही राज्यात मुख्यमंत्री होणार नाही, असा मुख्यमंत्री आपल्याला लाभला आहे. आपण कोणतीही गोष्ट लपवून करत नाही. जुन्या शिवसेनेचा कोणताही बाण आला, तर शिंदेच्या बाणापुढे टिकू शकणार नाही, असा टोला त्यांनी यावेळी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.

५० पैकी एकही आमदार हरणार नाही

सूरतला गेल्यानंतर पहिले तीन दिवस मी खरे सांगतो, एकही मिनिट झोपलेले नव्हतो. माझ्यासोबत असलेल्या आमदारांना माझी काळजी वाटत होती. पण मला माझ्यासोबत आलेल्या या आमदारांच्या करिअरची काळजी वाटत होती म्हणून मला झोप येत नव्हती. पण बाळासाहेबांच्या आशीर्वादाने सगळे योग्य घडले. आता मी शब्द दिलाय. ५० पैकी एकही आमदार हरणार नाही आणि पडला, तर मी राजकारण सोडून देईन, असे एकनाथ शिंदे म्हणाले.