इंधन दरात करकपात: पेट्रोल ५ रुपये, तर डिझेल ३ रुपयांनी स्वस्त

मुंबई ,१४ जुलै /प्रतिनिधी :- मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत राज्य सरकारकडून इंधन दरात करकपात करण्याची घोषणा करण्यात आली आहे. यानुसार पेट्रोल ५ रुपये, तर डिझेल ३ रुपयांनी स्वस्त होणार आहे.

Image

राज्यातील पेट्रोलच्या करात पाच रुपये प्रति लिटर आणि डिझेलच्या करात तीन रुपये इतकी कपात करण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. कर कपातीचा निर्णय आज ( १४ जुलै) मध्यरात्रीपासून लागू होईल.

पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार राज्य सरकारने जाणीवपूर्वक राज्यातील पेट्रोलच्या करात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. या कर कपातीमुळे राज्यातील जनतेला महागाईपासून दिलासा मिळेल. या कर कपातीच्या घोषणेमुळे राज्यातील जनतेला ६ हजार कोटी रुपयांच्या करातून दिलासा मिळेल.

पेट्रोल-डिझेल स्वस्त; राऊत म्हणाले ‘मस्त’!

राज्यात नव्याने आलेल्या फडणवीस-शिंदे सरकारने अखेर पेट्रोल आणि डिझेलच्या किमती संदर्भात मोठा निर्णय घेतलाच. गुरुवारी (दि. १४ जुलै) झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत कपात करण्याबाबत जाहीर केले. विशेष म्हणजे फडणवीस-शिंदे सरकारच्या या निर्णयाचे कौतुक करत खा. संजय राऊत यांनी त्याचे स्वागत केले आहे. पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसाठी नागपूर दौऱ्यावर असताना ते यासंदर्भात पत्रकारांशी बोलत होते.
 “पेट्रोल आणि डिझेलच्या किमती संदर्भात घेतलेला निर्णय ही चांगली गोष्ट आहे. लोकांना या गोष्टीतून दिलासा मिळणार असेल आणि याबाबत सरकारने निर्णय घेतला असेल तर त्याचं नक्कीच स्वागत केलं पाहिजे.”, असे राऊत यावेळी म्हणाले.